राज्यात महायुतीचे सरकार आले असून आता मंत्रिपदासाठी आमदार लॉबिंग करत आहेत. अशातच शिंदेंच्या गोटातून बातमी समोर आली आहे. मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या दोम आमदारांचा पत्ता कट झाला आहे. कोण आहेत ते आमदार जाणून घ्या.
शिंदेंच्या शिवसेनेमधील मंत्रिपदासाठी उत्सुक असलेले दोन आमदार नापास तर पाच आमदार पास झाले आहेत. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार अशी नापास झालेल्या मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. तर जे आमदार पाच झालेत उदय सामंत, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक अशी त्यांची नावं आहेत. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. यामधील अब्दुल सत्तारांकडे अल्पसंख्याक विकास आणि संजय राठोडांकडे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती.
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेतून बंड करताना साथ दिलेल्या शिलेदारांसाठी धक्कादायक बातमी आहे. याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यंदा भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी इच्छुक असून मागील मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. मात्र यंदा संभाव्य यादीमध्ये गोगावले यांचेही नाव आहे. तर उदय सामंत, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक ही पाच नावं जवळपास निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये शिंदे गटाला १३ ते १४ मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेच्या कोणत्या शिलेदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.