Chhatrapati Sambhajinagar Paithan Three Members Family Murder: संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (३५), त्यांची पत्नी आश्विनी (३०) व मुलगी सायली (१०), अशी मृतांची नावे आहेत. तर, राजूचा यांचा मुलगा सोहम (६) हा या घटनेत जखमी झाला होता.
हायलाइट्स:
तिघांच्या हत्येप्रकरणी तिहेरी जन्मठेप
सहा वर्षांच्या मुलावरही वार
लोहाराकडून बनवून घेतली तलवार
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील जुने कासवन गावात चार वर्षांपूर्वी घरात घुसून एकाच कुटुंबातील आई, वडील व दहा वर्षीय मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणात अक्षय प्रकाश जाधव (२७, रा. माळवाडी, सोलनापूर शिवार, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला तिहेरी जन्मठेपेसह एकूण ४० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी नुकतीच ठोठावली. आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम मृताच्या वारस मुलाला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (३५), त्यांची पत्नी आश्विनी (३०) व मुलगी सायली (१०), अशी मृतांची नावे आहेत. तर, राजूचा यांचा मुलगा सोहम (६) हा या घटनेत जखमी झाला होता. फिर्यादीनुसार, मृत संभाजी उर्फ राजू यांच्या पुतणीवर आरोपी एकतर्फी प्रेम करीत होता. याबाबतची माहिती मृताला मिळाली होती. त्यामुळे आरोपी अक्षय जाधव व त्याच्या कुटुंबियांना गाव सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जावे लागले होते. तसेच आरोपीचा भाऊ हा अचानक बेपत्ता झाला होता. यामागेही संभाजी उर्फ राजू यांचा हात असल्याचा संशय होता. दरम्यान, २९ ऑगस्ट २०१९ रोजी मृताच्या पुतणीने दिलेल्या फिर्यादीवरुन, आरोपीविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी या गुन्ह्यात जामिनावर असताना २७ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी आरोपीने मृताच्या पुतणीचा पाठलाग केला. यावरुन मृत संभाजी व आरोपी अक्षय यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने त्याला ‘तुला आता सोडणार नाही’ अशी धमकी दिली होती. त्याच रात्री म्हणजे २८ नोव्हेंबर २०२० रोजीच्या मध्यरात्री ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान आरोपी हा लोखंडी तलवार, सत्तुर आणि पेट्रोलची बाटली घेऊन मृताच्या घरात शिरला व त्याने झोपेत असलेल्या संभाजी उर्फ राजू, त्यांची पत्नी अश्विनी, दहा वर्षांची मुलगी सायली आणि सहा वर्षीय मुलगा सोहम यांच्यावर तलवार, सत्तुरने वार केले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सोहम हा बचावला. आता मंत्रिपदे, खात्यांवर खल; शिवसेनेला १०, तर ‘राष्ट्रवादी’ला सात कॅबिनेट मंत्रिपदे?
खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ व मधुकर आहेर यांनी २६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी अक्षय जाधव याला दोषी ठरवून तिहेरी जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये आणि आर्म ॲक्टच्या कलम २७ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, असा एकूण ४० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात ॲड. शिरसाठ यांना ॲड. तेजस्विनी मोने व ॲड. दिलीप खंडागळे यांनी सहाय्य केले.
सहा वर्षांच्या मुलावरही वार
घटनेच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय हा मृताकडे कामाला होता. त्यामुळे आरोपीला घरातील सर्वजण ओळखत होते. घटनेच्या दिवशी मृताचे संपूर्ण कुटुंब झोपेत असताना, आरोपीने त्यांच्यावर वार केले. तेव्हा सोहमला जाग आली. तो ‘अक्षय दादा, अक्षय दादा आम्हाला मारू नको’ अशा विनवण्या करीत राहिला, मात्र आरोपीला त्याची दया आली नाही. सोहमवरदेखील त्याने वार केले. सुदैवाने त्यात तो बालंबाल बचावला.
लोहाराकडून बनवून घेतली तलवार
आरोपी अक्षय याने मृत संभाजी यांचा बदला घेण्याचे आधीच ठरवले होते. त्यासाठी त्याने घटनेच्या १५-२० दिवसांपूर्वी एका लोहाराकडून तलवार व सत्तुर बनवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा