Nagpur Buffalo Attack: पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जनावरे अनेकदा पिसाळलेली नसतात, परंतु वेदना, भीती किंवा अचानक झालेल्या जखमेमुळे ती आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास नागपुरातील महालातील टिळक पुतळा परिसर, जुना हिस्लॉप कॉलेज गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दसरा रोड या भागात ही घटना घडली. सकाळच्या वेळी परिसरात नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. याचदरम्यान एका भटक्या कुत्र्याने म्हशीला चावा घेतल्याने ती अचानक अस्वस्थ झाली. काही क्षणातच ती नियंत्रणाबाहेर जात सैरावैरा धावू लागली आणि रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांवर हल्ला करू लागली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. म्हशीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जीवाच्या आकांताने पळापळ केली. काहींनी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये आश्रय घेतला. या हल्ल्यात किमान दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, महाल परिसरातील बँक ऑफ बडोदा जवळून जात असताना म्हशीने लक्ष्मण कुंभारे या ९२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक झालेली म्हैस रस्त्यावर धावत असल्याने नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत होते. अखेर स्थानिक नगरसेवक सचिन नाईक, त्यांचे कार्यकर्ते, पोलिस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून भट सभागृह परिसरात त्या म्हशीला पकडले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेमुळे नागपूर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागात मोकाट गायी, बैल आणि म्हशी रस्त्यावर फिरताना दिसतात. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच नागपुरात एका मोकाट वळूने ६४ वर्षीय महिलेवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
