• Tue. Jun 16th, 2026

    Sunetra Pawar : ‘1 वर्षांपर्यंत प्रसुती रजा’ ते ‘लवकर या लवकर जा’ योजना, सुनेत्रा पवार यांच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा

    Sunetra Pawar : ‘1 वर्षांपर्यंत प्रसुती रजा’ ते ‘लवकर या लवकर जा’ योजना, सुनेत्रा पवार यांच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पहिल्यांदाच विधान परिषदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी महिलांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील सरकारी कर्मचारी महिलांसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ‘लवकर या, या लवकर जा’, अशी योजना सुनेत्रा पवार यांनी जाहीर केली आहे. मुंबई महानगर प्रदेशात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांसाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव महिलांना प्रसुती रजा आता 1 वर्षापर्यंत घेता येणार, अशीदेखील महत्त्वाची घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली आहे.

    महिलांना प्रसुती रजा 1 वर्षांपर्यंत घेता येणार

    “महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसांची प्रसुती रजा मंजूर करण्यात आली आहे. प्रसुती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धेवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मातृत्वाचा सन्मान राखत, महिलांना कुटुंब आणि सेवेत समतोल राखता यावा हा या निर्णयामागचा उद्देश आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

    ‘लवकर या, लवकर जा’ योजना काय?

    “महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कम अर्ली, गो अर्ली या संकल्पने अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9.15 ते 9.40 या दरम्यान लवकर येऊन जितके मिनिटे आधी येऊन कामकाज करता येतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटे सवलत देण्यात येईल. या निर्णयामुळे गर्दीमुळे महिलांचा होणारी गैरसोय नक्कीच कमी होण्यात मदत होईल”, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली.

    शक्ती विधेयकावर भाष्य

    “शक्ती फौजदारी कायदा 2020 हे विधेयक राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र केंद्र सरकारने 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव व विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरु आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन विशेष प्रयत्न करेन”, अशी ग्वावी सुनेत्रा पवार यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा