Vinayak Raut Criticize Eknath Shinde: यंदाच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेला विलंब झाला. यावरुन सत्ताधारी मात्र विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनीही भाजप आणि सहकारी पक्षावर खोचक टीका केली आहे.
रत्नागिरी येथे माजी खासदार विनायक राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विनायक राऊत म्हणाले, मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. बहुमत मिळून तेरा दिवस उलटून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळत आहे, याच्यामागचे कारण भाजप आणि गद्दार गटाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत राहिलेली नाही. गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा, असे सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे,’ असा चिमटा देखील विनायक राऊत यांनी काढला आहे.
Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार?
तसेच ‘उद्याच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विचाराला कुठेही किंमत दिलेली दिसत नाही. तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर आमच्या सोबत अजित पवार आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे,’ असाही खोचक टोला देखील विनायक राऊतांनी लगावला.
विनायक राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे. भाजपने शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडण्याचे पाप केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी तांत्रिक बाब असेल तर मग शपथ का घेत आहात? शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोडो रुपये का खर्च केला जातोय? पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलावलं जातं आहे? तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ती आता बस झाली, आता जे काही दिवे लावायचे ते लावा.
यासोबतच विनायक राऊतांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईव्हीएमचा घोटाळा झाला असल्याचे देखील नमूद केले. तर ‘हा मेरिटवर मिळवलेला विजय नाही.’ असे म्हणत आम्ही पुन्हा एकदा उभे राहू आणि आमचा भगवा झेंडा फडकवून दाखवू, असा निर्धार देखील केला आहे.