• Thu. Dec 26th, 2024
    त्यांना सकाळी, संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव! शिंदेंचा टोला; दादा म्हणाले, आमचं तेव्हा…

    Ajit Pawar: राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. भाजपच्या निरीक्षकांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राजभवन गाठलं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. भाजपच्या निरीक्षकांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राजभवन गाठलं. राज्यपालांची भेट घेत त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

    फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे असणार का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्यावर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. ‘एकनाथ शिंदेंची मी काल भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सरकारमध्ये असावं ही आमची आणि शिवसेनेच्या आमदारांची इच्छा आहे. शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. मुख्यमंत्रिपद तांत्रिक आहे. आम्ही तिघे मिळून सरकार चालवणार आहोत’, असं फडणवीस यांनी सांगितलं.
    Ajit Pawar: तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ
    मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माध्यमांशी संवाद झाला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तुम्ही दादांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी शिंदेंना विचारला. त्यावर आताच देवेंद्रजींना याबद्दल सांगितलंय. मी पण तेच सांगतोय, तुम्ही थोडं थांबा. संध्याकाळपर्यंत थांबा. शपथविधी उद्या आहे. त्याला अजून वेळ आहे, असं उत्तर शिंदेंनी दिलं.

    शिंदे उत्तर देत असताना अजित पवार मध्येच बोलले. ‘संध्याकाळपर्यंत त्यांच्या शपथविधीचं समजेल. पण मी तर शपथ घेणार आहे. माझं ठरलंय,’ असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर एकच हास्यकल्लोळ उडाला. अजित पवारांचं मिश्किल विधान ऐकून सारेच हास्याची कारंजी उडाली. शेजारी बसलेल्या शिंदे, फडणवीस यांनाही हसू आवरता आलं नाही.
    ते आधी डोक्यातून काढून टाका! अजितदादांनी वाचली दिल्ली भेटीच्या कारणांची लांबलचक यादी
    अजित पवारांच्या मिश्किल विधानावर सगळे हसत असताना एकनाथ शिंदेंनी संधी साधली आणि टोला लगावला. ‘दादांना संध्याकाळी शपथ घ्यायचाही अनुभव आहे आणि सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे,’ असं शिंदे म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा खसखस पिकली. सगळे खो खो हसले. शिंदेंनी टोला लगावल्यावर दादा पुन्हा बोलले. ‘आम्ही (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) दोघांनी सकाळी शपथ घेतली होती. त्यावेळचं राहून गेलं होतं. आता पुढे ५ वर्षे आम्ही राहणार आहोत,’ असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा सगळेच पोट धरुन हसले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed