• Sat. Nov 30th, 2024
    Nagar News: माझ्या कुटुंबातील चार मतं कुठे गेली? EVMवर शंका व्यक्त करत अपक्ष उमेदवाराचा सवाल

    Chandrahans Annasaheb Autade: नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पोहेगाव येथील रहिवाशी चंद्रहंस अण्णासाहेब औताडे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

    हायलाइट्स:

    • माझ्या कुटुंबातील चार मतं कुठे गेली?
    • EVMवर शंका व्यक्त करत अपक्ष उमेदवाराचा सवाल
    • चंद्रहंस अण्णासाहेब औताडे अपक्ष उमेदवार
    Lipi
    नगर अपक्ष उमेदवार चंद्रहंस अण्णासाहेब औताडे

    मोबीन खान, नगर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून महायुतीला घवघवीत यश मिळालं असून महाविकास आघाडीची मोठी हार झाली आहे. निकालानंतर अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असून अनेकांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अशातच नगर जिल्ह्यातील २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने ईव्हीएम मशीन बाबत शंका व्यक्त करत स्वतःच्या कुटुंबातील चार मते गेली कुठे? असा सवाल उपस्थित करत ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत यंत्रणेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पोहेगाव येथील रहिवाशी चंद्रहंस अण्णासाहेब औताडे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचे निवडणूक चिन्ह जहाज होते. त्यांना निवडणुकीत एकूण १८२ मतं मिळाली. मतदारसंघातील बूथ क्रमांक २२२ मध्ये चंद्रहंस औताडे यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला आणि संपूर्ण कुटुंबातील सात मतदान जहाज या चिन्हावर झाल्याचा दावा अपक्ष उमेदवार औताडे यांनी केला असून सात पैकी फक्त तीनच मतं त्या बुथवर दाखवत असल्याने इतर चार मते गेली कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर रांजणगाव देशमुख येथील बूथ क्रमांक २७० मध्ये माझी पुतणी आणि तिच्या घरच्यांनी एकूण तीन मत मला जहाज या चिन्हावर दिली असल्याचा दावा देखील त्यांनी केला असून तेथे तर शून्य मतं मिळालेली आहे. मग ती तीन मते गेली कुठे? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सदर मते गेली कुठे याचं उत्तर निवडणूक आयोगाने मला द्यावं अशी अपेक्षा औताडे यांनी व्यक्त केली आहे. संदीप वर्पे यांनी अपक्ष उमेदवार चंद्रहंस औताडे यांच्या बूथवर फेर मतमोजणीची मागणी केली असल्याने निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
    आई-बहिणीवरुन शिवीगाळ केल्यास दंड, ग्रामपंचायतीचा आदर्श निर्णय, तिसरा ठराव वाचून छाती अभिमानाने फुलेल

    आम्हाला फेर मतमोजणीचा अधिकारच नाही

    ज्यावेळेस मी बुथवाईज आकडेवारी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या कुटुंबातील ४ मते कमी आहे. त्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यास गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला फेर मत मोजणीसाठीचा अधिकार नाही. फक्तं दोन नंबर किंवा तीन नंबर वर राहिलेल्या उमेदवारांना याचा अधिकार आहे. त्यानंतर मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांच्याशी संपर्क करून त्यांना फेर मतमोजणीसाठी मागणी करावी अशी विनंती केल्यानंतर त्यांनी फेर मतमोजणीची मागणीसाठी अर्ज दाखल केला असल्याचे चंद्रहंस औताडे यांनी म्हटले आहे.

    बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे

    माझ्या कुटुंबातील सर्वांनी मलाच मतदान केलेला आहे. परंतु कमी मतं दाखवण्यात येत असल्याने मला या प्रक्रियेवर किंवा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही. त्यामूळे भविष्यातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावे अशी माझी निवडणूक आयोगाकडे मागणी असल्याचे चंद्रहंस औताडे यांनी म्हटले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed