Panvel Road Project: पनवेलबाजूने आल्यानंतर मुंब्रा मार्गाला जोडण्यासाठी आणि स्टीलमार्केटकडे जाण्यासाठी दोन अंडरपास बांधण्यात येणार आहेत. दोन्ही अंडरपास नव्याने विकसित करण्यात येणार आहेत.
नवी मुंबईच्या विमानतळावरून एप्रिल २०२५ रोजी विमानोड्डाण होण्याची शक्यता आहे. पनवेलबाजूकडून विमानतळाला जोडणारा रस्ता कळंबोली सर्कलपासून अवघ्या काही मिनिटांवर आहे. जेएनपीटी, स्टीलमार्केट, शिळफाटा, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, पनवेलमधून जाणारा जुना मुंबई-पुणे महामार्ग, जेएनपीटीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अशा वेगवेगळ्या रस्त्यांना जोडणारा कळंबोली सर्कलवर सध्या ताण आहे. मध्यरात्र ते सकाळपर्यंतची वेळ वगळल्यास वाहतूक पोलिसांशिवाय सर्कलची वर्दळ सुरळीत राहात नाही.
मुंबईहून गोवा, अलिबाग, पुणे; तर शिळफाट्याहून पुणे, जेएनपीटी, गोवा अलिबाग या भागांत जाणाऱ्या वाहतुकीमुळे राज्यातील महत्त्वाच्या मागांना जोडणारे सर्कल आहे. परगावी जाणाऱ्या वाहनांसोबत स्थानिक नोकरी, व्यवसाय, शाळा, महाविद्यालांतील तरुणांना या कोंडीत अडकावे लागते. येत्या तीन वर्षांत ही कोंडी इंटरचेंजच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे. सिग्नलविरहित रस्त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बरोबरीने आणि दोन टप्प्यांवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकल्पाची वर्कऑर्डर टीआयपीएल कंपनीला देण्यात आल्याची माहिती कंपनीचे संचालक धरणीकुमार यांनी दिली.
नवीन चार रस्त्यांचा विकास
- मुंब्रा मार्गावरून जेएनपीटीकडे
- जेएनपीटी मार्गावरून मुंब्रा मार्गाकडे
- जेएनपीटीकडून मुंबईच्या दिशेने सायन-पनवेल महामार्गावर
- मुंबईहून येणाऱ्या वाहनांना जेएनपीटीच्या दिशेने जाण्यासाठी
- असे चार वेगवेगळे रस्ते विकसित केले जाणार आहेत. या चार रस्त्यांची एकूण लांबी पाच किमी इतकी असेल.
इंटरचेंजच्या पहिल्या मजल्यावर पाच उड्डाणपूल
- जेएनपीटीहून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी
- पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी
- पनवेलहून येणाऱ्या रस्त्यावर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी
- मुंब्रा मार्गाने आल्यास पुण्याच्या दिशेने एक्स्प्रेसवेच्या दिशेने जाण्यासाठी
- शिळफाट्धाहून स्टीलमार्केटच्या दिशेने जाण्यासाठी
- या प्रकारे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला ओलांडून एकमेकांशी जोडणारे वेगवेगळ्या मागाँवर पाच उड्डाणपूल तीन किमी लांबीचे बांधण्यात येणार आहेत. इंटरचेंज रस्त्याची ही पहिली लेव्हल म्हणजेच पहिला मजला असेल.