Congress Leaders Dissatisfaction with Nana Patole: विधानसभा निवडणुकीत पक्षाचे झालेले पानिपत लक्षात घेता नाना पटोलेंनी उमेदवार कसे निश्चित यावर चौकशी व्हावी, असे पत्र काँग्रेसच्या असंतुष्ट गटाने लिहले आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस महाआघाडीने उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे मनोबल ढासळले होते. विधानसभेत किती जागा मिळतील, याची खात्री त्यांच्या एकाही नेत्याला नव्हती. काँग्रेस आघाडी सत्तेत येईल, अशी धास्तीही त्यांना होती. यानंतरही असा दारुण पराभव अनाकलनीय आहे. जागा वाटपातील वाटाघाटी, मिळालेल्या जागा, मतांचा टक्का आणि विजयी जागांच्या संख्येमुळे तिकीट विकल्याची शंका कार्यकर्त्यांना आहे. अनेक मतदारसंघात हातमिळवणी तर नव्हती ना, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असेही पत्रात नमूद आहे.
महायुतीच्या मोठ्या कमबॅकनंतर मविआचे ईव्हीएमविरोधी कार्ड, पण तिथे सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय
प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, काँग्रेसचे प्रदेश सचिव व विदर्भ मुस्लीम फोरमचे अध्यक्ष आर.एम. खान नायडू, इकराम हुसेन, विजय बाहेरकर, मोईन काझी, अब्दुल मजीद कुरेशी, प्रशांत शिंदे, मनोज बागडे, गौस खान, इदरिस मेमन, संजय कडू आणि शादाब खान आदींनी पत्र पाठवले आहे.
सोशल इंजिनीअरिंगला पार हरताळ फासण्यात आला. राखीव जागांचा अपवाद वगळता अन्य समाजाचा विचार झाला नाही. तेली, माळी, मुस्लिम, जैन, मारवाडी आदी समाजांना पार डावलण्यात आले. समाजासमाजात वाद निर्माण करण्याचे काम केले. अशा वादात भंडारा, चंद्रपूरसारख्या जागा पक्षाने गमावल्या. हायकमांडच्या नावाखाली काही नेत्यांनी आपल्या मर्जीनुसार उमेदवार निश्चित केले. कुठलेच सामाजिक समीकरण बघितले नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अहंकार, विविध समाजाचा द्वेष, चुकीचे उमेदवार देणे आदी पराभवाची कारणे आहेत. हा पराभव म्हणजे धोक्याची घंटा आहे. संपूर्ण संघटन नव्याने बांधण्याची वेळ आली आहे. प्रदेश, जिल्हा व शहर समितीसह विविध आघाड्या व सेल बरखास्त करून संपूर्ण रचना नव्याने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.