• Mon. Nov 25th, 2024
    चिमूरात सर्वाधिक, चंद्रपुरात कमी मतदान,: कुणाला धोका, कुणाला लाभ ?

    | Updated: 21 Nov 2024, 11:44 am

    Maharashtra Voting Percentage : मतदानाचा वाढलेला आणि घसरलेला टक्का, कुणासाठी फायदेशीर, कुणाला फटका बसविणार याचे गणित राजकीय विश्लेषक जुळविण्यात व्यस्त आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश झाडे, चंद्रपूर : विधानसभेसाठी बुधवारी मतदान पार पडले. चंद्रपूर जिल्हात सरासरी 71.27 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक चिमूर मतदार संघात 81.75 टक्के मतदान झाले तर सर्वाधिक कमी मतदान चंद्रपूर मतदार संघात झाले. मतदानाचा वाढलेला आणि घसरलेला टक्का, कुणासाठी फायदेशीर, कुणाला फटका बसविणार याचे गणित राजकीय विश्लेषक जुळविण्यात व्यस्त आहेत.

    चिमुरात धाकधूक

    चिमूर मतदार संघात भाजपचे बंटी भांगडीया, विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने सतीश वारजूरकर यांना उभे केले. येथे भाजप-काँग्रेस मध्ये थेट लढतीचे चित्र येथे निर्माण झाले होते. प्रचारात काँग्रेसने येथे आघाडी घेतली होती. चिमूर मतदार संघात एकूण मतदार 280827 आहेत. जिल्हातील सहा मतदारसंघांपैकी चिमूर मतदार संघात सर्वाधिक मतदान झाले. मतदानाचा वाढलेला टक्का काँग्रेसला फायदेशीर ठरेलं असे आता बोलले जात आहे. या मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील सात हजार पेक्षा अधिक मतदार होते. हे मतदार येथील निकालाला प्रभावित करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    टक्का घसरला, जोरगेवारांची चिंता वाढली

    चंद्रपूर मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. येथे मतदानाची टक्केवारी 57.98 टक्के आहे. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 373927 आहे. येथे मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र घसरलेला मतदानाचा टक्का राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. या मतदार संघात निवडणुकीच्या धामधुमीत किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा जोरगेवार पक्षात नको असा सूर लावला होता. जोरगेवार यांचा विरोधात काँग्रेसचे प्रवीण पडवेकर उभे होते. भाजपचे ब्रिजभूषण बाजारे यांनी येथे बंडखोरी केली होती. येथे तिहेरी लढतीचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का कुणासाठी फायदेशीर आणि कुणाला धक्का देणारा आहे याकडे लक्ष लागले आहे.

    कौटुंबिक वाद कुणासाठी लाभदायक?

    वरोरा मतदार संघात धानोरकर विरुद्ध धानोरकर अश्या लढतीचे चित्र निर्माण झाले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे काँग्रेसकडून तर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे भाऊ अनिल धानोरकर वंचित कडून उभे होते. प्रचारादरम्यान दोघांनी एकमेकांवर व्यक्तिगत टीका केली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. येथे ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार मुकेश जीवतोडे यांची चर्चा रंगली आहे. येथे चौरंगी लढतीचे चित्र आहे. 68.48 टक्के येथे मतदान झाले आहे.

    अशी आहे आकडेवारी

    राजुरा – 72.71
    चंद्रपूर – 57-98
    बल्लारपूर – 69.7
    ब्रम्हपुरी – 80.54
    चिमूर – 81.75
    वरोरा – 69.48

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed