बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान तणाव निर्माण झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाकडून बोगस मतदानाचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, मतदारांना घड्याळाच्या चिन्हाची बनावट स्लिप दिली जात आहे. मात्र, अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावत शर्मिला पवार खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
बारामतीमधील महात्मा गांधी बालक मंदिर या मतदारसंघामध्ये हा गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. या गोंधळानंतर स्वत: अजित पवार तिथे आले आहेत. मला माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास असून शर्मिला पवार खोटे आरोप केलेत. बोगस मतदानाची निवडणूक आयोग तपास करतील. तक्रारीमध्ये काही तथ्य असायला हवे, उलट माझ्या पोलिंग एजंटला बाहेर काढल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून निवडणूक लढवत आहोत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो, आमच्या कार्यकर्ते असं करणार नसल्याचंही अजितदादांनी सांगितलं.
बारामतीमध्ये शर्मिला पवार स्वत:या मतदान केंद्राच्या बाहेर ठाण मांडून बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते बसले होते. बोगस मतदानाचा आरोप झाल्यावर स्वत: अजितदादांनी मतदानकेंद्रावर धाव घेतली. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावले.
दरम्यान, बारामती मतदारसंघात काँटे की टक्कर असून अजित पवारांविरूद्ध शरद पवार गटाचे युगेंद्र पवार उभे आहेत. पवार घरामधील दुसरी प्रतिष्ठेची लढत होत आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीची जनता कोणाला गुलाल उधळण्याची संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.