शिरूर लोकसभेतील भाजप नेते अतुल देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महाविकास आघाडीचे जागावाटप, माढा आणि साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार, नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील सभा, विरोधकांचा प्रचार अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी अजित पवार यांच्या ‘बारामतीत पवार आडनावामागेच उभे राहा’ या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला.
अन् पत्रकार परिषदेमध्ये हास्यकल्लोळ
‘अजित पवार यांच्या बोलण्यात चुकीचे काय आहे? बारामतीची जनता नेहमी पवार आडनावामागेच उभी राहते. मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवार….’ असे शरद म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ झाला. सुप्रिया सुळे या मूळ पवार असल्याचे सांगत सुनेत्रा पवार विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्ष सांगत बारामतीकर पवार आडनावामागेच उभी राहिल, अशी टोलेबाजी करून शरद पवार यांनी अजित पवार यांच्या शाब्दिक डावपेचाला बिनतोड उत्तर दिले.
अजित पवार नेमके काय म्हणाले होते?
मला म्हणजे मुलाला, साहेबांना म्हणजे बापाला, सुप्रिया म्हणजे लेकीला आजपर्यंत बारामतीकरांनी निवडून दिले. आता सुनेत्राला म्हणजे सुनेला बारामतीकरांनी निवडून द्यावे म्हणजे फिट्टमफाट होईल. तुम्हीही खूश-आम्हीही खूश, अशी शाब्दिक फटकेबाजी अजित पवार यांनी केली होती. बारामती शहर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मंगळवारी अजित पवार यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
शरद पवार यांनी सोमवारी पुरंदर, बारामती तालुक्यांतील काही भागांत दौरा करून सुप्रिया सुळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर,‘सुनेला निवडून दिले, तर मी ही खूश होईन. तुम्हीही खूश व्हाल,’ असे अजित पवार म्हणाले. त्यावेळी त्यांची फटकेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये खसखस पिकली होती.