अकोला: महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप जाहीर केलं. या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाने आपल्याकडे खेचून नेला. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा सांगली मतदारसंघ मिळवण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी मोठा संघर्ष केला, पण तरीही काँग्रेस ही जागा वाचवू शकले नाही. जागावाटप जाहीर झाल्यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल होते. तर विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे सकाळीच मला भेटून गेले असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची चिन्ह आहेत.
“काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे की नाही, सांगलीत शिवसेनेचं काहीच नव्हतं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून त्यांनी ही जागा घेतली. आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील हे येऊन गेले, आमची चर्चा झाली, लवकरच ते निर्णय घेतली अशी अपेक्षा मी बाळगतो. सध्या त्यांना कुठलाच आग्रह केलेला नाही, सल्ला दिलेला नाही, उमेदवारी दाखल केल्यावर विशाल पाटलांसदंर्भात निर्णय घेऊ”, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
त्यामुळे विशाल पाटील हे वंचितकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहावं लागेल.