• Sat. Sep 21st, 2024
नवनीत राणांच्या मदतीला जुन्या-जाणत्या नेत्यांची फौज, तब्बल १२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

अमरावती : यंदाची अमरावती लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने चांगलीच गांभीर्याने घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमरावती जिल्ह्याचे राजकीय गणित व परिस्थिती बघता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप खासदार नवनीत राणा यांच्या मदतीला भाजपच्या जुन्या, जाणत्या व अनुभवी नेत्यांची फौज सज्ज केली आहे. भारतीय जनता पक्षाची पक्षशिस्त, कार्यकर्त्यांची एकनिष्ठत्याचे सकारात्मक तेवढेच अनुकरणीय उदाहरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे.खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अमरावती जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते स्वतःला झोकून देत पक्ष्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भविष्यातील राजकीय गणिते जुळवत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची शिस्त व वैचारिक वारसा असलेल्या वक्त्यांची फौज नवनीत राणा यांच्या दिमतीला उभी केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या मतदारसंघांमध्ये एकूण तब्बल १२ वक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
विशाल पाटील नॉट रिचेबल, भाऊ प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, सांगलीत मविआला धक्का?

यामध्ये बडनेरा मतदार संघातील सभांना स्टार प्रचारक शिवराय कुलकर्णी व किरण पातुरकर, अमरावतीसाठी जयंत डेहनकर आणि आमदार प्रवीण पोटे. दिवसा मतदारसंघाकरिता निवेदिता चौधरी व राजेश वानखडे, दर्यापूर मतदारसंघाकरिता माजी आमदार रमेश बुंदेले व गोपालचंदन, मेळघाटकरिता प्रभुदास भिलावेकर व बादल कुलकर्णी तर अचलपूर मतदारसंघाकरिता प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी व प्रवीण तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झालेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed