• Sat. Sep 21st, 2024
‘मोदींना हरवणं महत्त्वाचं…’ कॉम्रेड गावितांची माघार, भगरे गुरूजींचा मार्ग मोकळा

शुभम बोडके, नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून दिंडोरीची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. राष्ट्रवादीने दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भगरे यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका घेत महायुतीच्या भारती पवार यांना आव्हान देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार द्यावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यानंतर माकपने अपक्ष उमेदवारीच हत्यार उपसले होते. तशी तयारी देखील माकपने मतदारसंघात सुरू केल्याचा पाहायला मिळाले. मात्र अखेर वरिष्ठांच्या चर्चेनंतर दिंडोरी लोकसभेतून माकपने माघार घेत महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले आहे. दिंडोरी लोकसभेतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यातून एकच जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव महाविकास आघाडीने मंजूर न करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा देत भास्कर भगरे यांना उमेदवारी देखील जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेले माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र वरिष्ठांच्या चर्चेनंतर अखेर बंडाचे हत्यार उपसणाऱ्या गावित यांनी एक पाऊल मागे घेत आघाडीचा धर्म दिंडोरी लोकसभेत पाळला जाईल आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना विजयी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आघाडी घेईल असे सांगितले.
दिंडोरीत मविआमध्ये बिघाडी होणार? बड्या नेत्याची निवडणुकीची तयारी, पवारांना धक्का

माकपाची दिंडोरी लोकसभेत मोठी ताकद आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाटही मोकळी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिंडोरीत भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर भास्कर भगरे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता भगरे यांची लोकसभेत शेवटपर्यंत ओळख नसल्याचे माकपने सांगितले.

सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच; चंद्रहार पाटलांची विशाल पाटलांना साद


त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे महाविकास आघाडीतून नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. शरद पवार यांनी हीच परिस्थिती बघून कांदा, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या भास्कर भगरे यांना उमेदवारी देत एक नवी चाल खेळल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी, बेरोजगार युवकांचे प्रश्न, महागाई या मुद्द्यावर दिंडोरी लोकसभेत निवडणुकीचे राजकारण फिरते ठेवत भगरे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील आदिवासींचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यांना अधोरेखित करत कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन राष्ट्रवादीने पुढे नेत भाजपच्या भारती पवार यांना कडवे आव्हान देण्यासाठी भगरे यांना मैदानात उतरवले असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed