महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आहे. या पक्षाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली असून, खैरे यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शहरातील प्रतिष्ठितांच्या भेटी घेत आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रचाराची रणनीतीही ठरली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मराठवाडा सचिव अॅड. अशोक पटवर्धन यांनी दिली. ते म्हणाले, ‘या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान आहे, त्यामुळे दहा मे रोजी उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभेची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडीचे मेळावे होणार आहेत. पहिल्या दिवशी गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व, दुसऱ्या दिवशी वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्य; तर तिसऱ्या दिवशी कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांना आघाडीच्या स्थानिक नेत्यांसह काही वरिष्ठ नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.’
प्रचार कार्यालयाची तयारी
चंद्रकांत खैरे यांचे प्रचार कार्यालय समर्थनगर येथे उभारण्याचे काम सुरू आहे. या कार्यालयाचे उद्घाटन १३ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या वेळीही आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित असतील असे अॅड. पटवर्धन म्हणाले.