• Mon. Nov 25th, 2024

    युरेनिअम व्यापाराचा झोल! बांधकाम व्यावसायिकाला साडेतीन कोटींना गंडवलं; ८ संशयितांविरुद्ध गुन्हा

    युरेनिअम व्यापाराचा झोल! बांधकाम व्यावसायिकाला साडेतीन कोटींना गंडवलं; ८ संशयितांविरुद्ध गुन्हा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : किरणोत्सर्गी साहित्यातील युरेनिअमच्या व्यापारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून संशयितांनी नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाला लूटल्याचा प्रकार उघड झाला. भारतीय व परराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक असल्याचा दावा करून आणि युरेनिअमच्या व्यापाराचा झोल करून आठ संशयितांनी व्यावसायिकाला साडेतीन कोटी रुपयांना गंडवले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत कोलकाता येथील कथित कंपनीच्या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    इंदिरानगर परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक राहुल शांताराम सावळे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित चंदनकुमार बेरा (रा. कोलकाता), रघुवीरकुमार ओंकार संधू (रा. पुणे), मुकेश कुमार, कांतिकुमार, बप्पीदास, आशिष रॉय आणि अरुप घोष (सर्व रा. कोलकाता) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

    दरम्यान, करोना काळात व्यवसायात वृद्धी नसल्याने फिर्यादी हे इतर ठिकाणी गुंतवणुकीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी १३ जुलै २०२२ रोजी संशयित संधू याने फिर्यादींशी संपर्क करून एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगितले. ‘रेडिओक्टिव्ह मटेरिअल’मध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल, असा दावा करून ‘आमचे रिसर्च सेंटर आहे. परराष्ट्रातील कंपन्यांतही गुंतवणूक आहे’, असेही संशयिताने सांगितले. फिर्यादी त्यांच्या मित्रासह कोलकाता येथे गेल्यावर अगदी आलिशान पद्धतीने त्यांचे आदरातिथ्य करण्यात आले. त्यातून फिर्यादी यांनी सुरुवातीला तीस लाख रुपये गुंतवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५ एप्रिल २०२४ पर्यंत एकूण तीन कोटी ४६ लाख रुपये गुंतवले. मात्र, त्याबदल्यात कोणताही परतावा किंवा व्यवसाय न झाल्याने फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

    सारे संशयित सराईत

    संशयितांनी नाशिकच नव्हे, तर देशभरात इतरही ठिकाणी या स्वरुपाची फसवणूक केली आहे. या प्रकाराला ‘राईस पूलर बिझनेस’ म्हटले जाते. संशयितांविरुद्ध काही महिन्यांपूर्वी पुण्यातील बंडगार्डन, मुंबई, बीड जिल्ह्यात गुन्हे नोंद आहेत. यासह फसवणूक करणारी कंपनी बनावट असून, त्यातील संशयित कोलकाता येथून गुन्ह्यांचे जाळे विणत असल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, फिर्यादींनी ३० लाख गुंतविल्यानंतर संशयितांनी आणखी पैसे गुंतविण्यास सांगितले. ‘पोलिसांनी वाहने पकडली, इथे-तिथे खर्च आहे’, असे दावे केले गेले. काही महिन्यांनी परतावा येत नसल्याने फिर्यादींनी पोलिसांत जाण्याचा दावा केला. त्यावरून संशयितांपैकी एकजण फिर्यादींकडे आला. ‘तुम्हाला तीन अलिशान कार देतो. पोलिसांत जाऊ नका’ असे सांगत, त्याने कार घराबाहेर उभ्या केल्या. तर या गुंतवणुकीबद्दल कोणाला सांगितल्यास कारवाई होईल, असा दावाही संशयितांनी केला होता.
    खासगी सावकार नाशिक पोलिसांच्या रडारवर; ५ टक्क्यांनी वसुली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
    – संशयितांतर्फे अमेरिकेतील कंपनीला युरेनिअम विक्रीचा दावा
    – भारताच्या पंतप्रधान कार्यालयाची परवानगी असल्याचा बनाव
    – संशयितांची कंपनी, त्यांच्या व्यवहारांची कागदपत्रे बनावट
    – संशयित व फिर्यादींचे ओळखीतून हितसंबंध
    – दोन बनावट वैज्ञानिकांच्या नावाचा वापर
    – फिर्यादी व संशयितांमध्ये सामंजस्य करार

    शासकीय यंत्रणा किंवा संशोधन संस्थांचा संशयितांच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. संशयितांवर यापूर्वीही या स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यांचा ‘लोकेशन’नुसार माग काढत आहोत. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसारही तपास सुरू आहे.- अशोक शरमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इंदिरानगर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed