• Wed. Nov 27th, 2024

    निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

    ByMH LIVE NEWS

    Apr 6, 2024

    मुंबई, दि. ६: निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मुंबई शहर जिल्हा प्रशासनाद्वारे विविधस्तरीय कार्यवाही सातत्याने व योग्य प्रकारे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये दादर पश्चिम परिसरातील शिवाजी मंदिर नाट्यगृह तसेच वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट माटुंगा येथे प्रशिक्षणासाठी  उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी भेट देऊन संवाद साधला.  तसेच त्यांच्या अडीअडचणी व अपेक्षाही जाणून घेतल्या. या दौऱ्यादरम्यान उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे,  निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    श्री. यादव म्हणाले की, आपल्यावर असलेली जबाबदारी ही खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व बाबी, पूरक साहित्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाच्या आवश्यक नोंदी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची  जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी आणि काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्या.असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed