Onion Garlic Price Hike: कांदेच नाही तर बटाटेही महागले आहेत. दोन आठवडे आधी किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये किलो असलेला बटाटा आता ५० व काही ठिकाणी ६० रुपये प्रति किलोवर गेला आहे.
कांद्याचे दर सातत्याने कमी-जास्त होत असतात. यंदा मात्र ते मुंबईतील किरकोळ बाजारांत पावसाळ्यापासून ३५ ते ४० रुपये किलोदरम्यान स्थिर होते. मात्र, मागील काही दिवसांत किमतीत अचानक वाढ सुरू झाली व आता काही ठिकाणी कांद्याने शतकी आकडा गाठला आहे. ‘मुंबई थंडी पडू लागल्याने अधिक तिखट व चटकदार खाद्यपर्थांची मागणी वाढली आहे. हॉटेल व रेस्तराँमध्येही वाढती मागणी दिसून येत आहे. परिणामी त्या क्षेत्राकडून व एकूणच कांद्याची मागणी १५ ते २० टक्के मागील दोन आठडव्यात वाढल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी कांदा ७० ते ८० रुपये किलो होता तो आता १०० रुपये किलोच्या घरात गेला आहे’, असे पवई परिसरातील भाजी विक्रेते अजय शिकेरकर यांनी सांगितले.
कांद्याचे दर
■ दक्षिण मुंबई : १०० ते ११० रु.
■ दादर परिसर : ८० ते ९० रु.
■ मध्य उपनगरे : ८० रु.
■ उत्तर उपनगरे : ६० ते ८०रु.
■ पूर्व उपनगरे : ७० ते १०० रु.
कांद्याचे हे दर मुंबईत विविध ठिकाणी वेगवेगळे आहेत. दक्षिण मुंबईत १०० ते ११०, दादर परिसरात ८० ते ९०, मध्य उपनगरांत ८०, उत्तर उपनगरांत ६० ते ८०, पूर्व उपनगरांत ७० ते १०० रुपये किलोदरम्यान आहेत. दुसरीकडे लसणाच्या दरांनीही सर्वसामान्यांना हैराण केले आहे. पावसाळ्यादरम्यान ६० ते ७० रुपये प्रति पाव किलो असलेले लसूण नवरात्रातील उपवासांचा कालावधी संपताच ८० मग १००, १२० रुपये पाव किलोवरुन आता १५० रुपये प्रति पाव किलो कडे जात आहेत.
Onion Price: महागड्या कांद्याबरोबर आता लसूणही रडवणार, कांद्याने शंभरी गाठली, लसणाच्या दरात विक्रमी वाढ
या क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांनुसार, वास्तवात दरवर्षी कांद्याचा साठा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान काहिसा महाग होतोच. दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात आला की, दर हळूहळू कमी होऊ लागतात. यंदा मात्र नवीन कांदा संथ गतीने बाजारात येत आहे. त्यामुळे एकूण मागणीच्या ८० टक्के मालच बाजारात येत आहे. त्यामुळे किमती वधारल्या आहेत. नाशिक पट्ट्यातून येणारा लसणाचा नवा माल येण्यास विलंब झाल्याने अफगाणिस्तानातील आयातीत लसूण काही प्रमाणात मागवावा लागत आहे. तो किरकोळ बाजारात ५०० रुपये किलोदरम्यान आहे. त्यामुळेच दरवाढ झालेली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.