• Mon. Nov 25th, 2024

    शरद पवार गटानेही हेरला भाजपाचा नाराज पदाधिकारी; ‘रावेर’मध्येही ‘जळगाव’प्रमाणेच धक्कातंत्र?

    शरद पवार गटानेही हेरला भाजपाचा नाराज पदाधिकारी; ‘रावेर’मध्येही ‘जळगाव’प्रमाणेच धक्कातंत्र?

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव

    जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांना पक्षात प्रवेश देत करण पवार यांना उमेदवारी देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. आता याचीच पुनरावृत्ती रावेर मतदारसंघात करण्याची खेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खेळली जात आहे. त्या दृष्टीने या मतदारसंघातील तिकीट नाकारलेला भाजपातील नाराज चेहरा पवार गटाने हेरला त्याच्या चर्चा सुरु असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. या खेळीमुळेच रावेर मतदारसंघात पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे.

    महाविकास आघाडीत रावेर मतदासंघाची जागा शरद पवार गटाच्या वाटाल्या आली आहेत. या मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. खडसे यांची उमेदवारी जाहीर होवून दोन आठवडे उलटून देखील शरद पवार गटाने या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही.

    जळगावची पुनरावृत्ती शक्य?

    जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने तिकीट कापलेले खासदार उन्मेश पाटील यांना फोडून पक्षात घेत त्यांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. अगदी तशीच खेळी रावेर मतदारसंघात शरद पवार यांनी सूरु केली आहे. याच मतदारसंघातील भाजपाच्याच एका निष्ठावंत घराण्याचा तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या युवा चेहऱ्याला संधी देण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे.

    भाजपाच्या नाराज पदाधिकाऱ्याने शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा मी देखील ऐकली आहे. मात्र, यबाबत मला काहीही माहीत नाही. उमेदवाराची घोषणा प्रदेशाध्यक्षांकडून होईल.

    -अॅड.रविंद्र पाटी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट

    त्या ’नाराज’ तरुणाशी चर्चा सुरु

    रावेर मतदारसंघातील भाजपाच्या निष्ठावंत परिवारावर सातत्याने अन्याय होत असल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने तेथिल समर्थक आक्रमक झाले होते. मात्र, भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन यांनी ते बंड शांत केले होते. मात्र, या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी शरद पवार गटाने पावले उचलली आहेत. आमदार रोहित पवार यांनी संबंधित युवा नेत्यासोबत मुंबईत गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त आहे. हा भाजपाचा नाराज युवा पदाधिकारी लेवा समाजाचा असल्याने त्याचा मतदारसंघात प्रभाव आहे. पवार गटाच्या गळाला लागल्यास रावेर मतदारसंघात देखील भाजपाला मोठा धक्का बसून निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

    म्हणून उमेदवारीस विलंब

    नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव पवार गट करीत असल्यामुळे रावेर मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यास विलंब होत आहे. दरम्यान, रावेर मतदारसंघातून इच्छुक असलेल्या संतोष चौधरी, अॅड. रविंद्र पाटील, श्रीराम पाटील यांना वेटींगवर ठेवण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed