• Sat. Sep 21st, 2024
धाराशिवमध्ये महायुतीमध्ये विरजण? तानाजी सावंतांचा पुतण्या अपक्ष लढण्याच्या तयारीत

धाराशिव: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असून नाराज असलेले शिंदे गटातील धनंजय सावंत हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची दाट शक्यता आहे. काल रात्री हजारो कार्यकर्ते सोनारी येथील कारखान्यावर धनंजय सावंत यांच्या समर्थनात एकत्र आले होते, अशा पोस्ट देखील सावंत समर्थक यांनी व्हायरल केल्या होत्या. शिंदे गटाला सदर जागा सुटली नसल्यामुळे शिंदे गटातील समर्थकांमध्ये नाराजी आहे. ‘ज्यांनी घड्याळ संपवलं त्यांना आपण सहकार्य करायचं नाही’, अशा पोस्ट व्हायरल करत धनंजय सावंत समर्थकांच्या भूमिकेमुळे आता अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काल रात्री हजारो समर्थक आणि धनंजय सावंत यांची भेट घेऊन त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची गळ घातल्याची माहिती मिळतेय.

सत्तांतर करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दीडशे बैठका घेतल्याचे जाहीर सभेत सांगितले होते. मात्र, स्वतःच्या पुतण्याला लोकसभेचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरल्याचे यातून दिसून येते. राज्याच्या राजकारणात डॉ. तानाजी सावंत यांचे महत्त्व कमी झाले की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सुरुवातीपासून उस्मानाबाद लोकसभेसाठी धनंजय सावंत इच्छुक होते, तसा त्यांनी प्रचार सुद्धा चालू केला प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुद्धा त्यांनी घेतला होता. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनंजय सावंत उमेदवारीबाबत मागणी सुद्धा केली होती. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या पुतण्याला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवून देण्यास कमी पडले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वडिलांनी माजी मुख्यमंत्र्याला पाडलं, लेकीनं २५ वर्षे अस्तित्व राखलं, गवळींची नेमकी ताकद किती?

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट यांनी शेवटपर्यंत आपला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी भाजपाकडून आमदार राणा जगदीश पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश माजी उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, सुधीर पाटील यासह इतर इच्छुक होते. तर शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक होते. माजी खासदार रवींद्र गायकवाड हे सुद्धा या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार हे इच्छुक होते. अत्यंत नाट्यमय घडलेल्या घडामोडीत उस्मानाबाद लोकसभेची जागा अजित पवार यांनी स्वतःकडे खेचून घेतली. सुरुवातीपासून या जागेसाठी इच्छुक असलेले शिंदे गटातील धनंजय सावंत यांना मात्र संधी भेटली नाही.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

पुढील चार दिवसांमध्ये सावंत समर्थक काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धनंजय सावंत कार्यकर्त्यांच्या इच्छेला साद घालतात की पक्षश्रेष्ठीच्या आदेशाला मान्य करतात. हे लवकरच दिसून येईल. एक मात्र नक्की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी अटळ असून महायुतीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed