• Sat. Sep 21st, 2024
छ.संभाजीनगर इमारत दुर्घटना; सात जणांच्या मृत्यूसाठी बिल्डिंग मालक जबाबदार, तक्रारीत काय कारणे दिली?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छावणी दाणा बाजारामधील इमारतीमध्ये व्हेंटिलेशन नसणे; तसेच विद्युत मीटरवर वाढविण्यात आलेला अतिरिक्त भार यामुळे वीज मीटरमध्ये झालेल्या बिघाडानंतर शॉटसर्किट झाले. या कारणांमुळे छावणीच्या दाणा बाजारमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सात जणांचा बळी गेला. यासाठी इमारतीचे मालक शेख अस्लम शेख युनुस हे जबाबदार आहेत. त्यांच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश नारायण माळी (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, छावणी दाणा बाजार येथे कापड दुकानाला आग लागली, अशी माहिती डायल ११२ वर देण्यात आली. ही माहिती पहाटे ३.४४ च्या दरम्यान मिळाली होती. या माहितीनंतर पोलिस दल या ठिकाणी पोहोचले. दरम्यान या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या होत्या. ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता; तसेच इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. या आगीत दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहत असलेले शेख वसीम, शेख सोहेल आणि त्यांच्या कुटुंबीयांपैकी अन्य पाच जणांचा बळी गेला. यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर बाकीच्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
प्रवाशांसाठी मोठी बातमी: उन्हाळी सुट्टीसाठी STच्या विशेष १०८८ बसगाड्या, कोणत्या जिल्ह्यातून किती बस धावणार?

या प्रकरणात आग लागलेल्या इमारतीचे मालक शेख अस्लम शेख युनुस (रा. घर क्रमांक २९५, दाणा बाजार, छावणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर करीत आहेत.

तक्रारीत देण्यात आलेली कारणे

– या इमारतीमध्ये कापड दुकान व टेलरिंगचे दुकान चालवित होते.

– पूर्ण इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा वापरात होता.

– दुकानात व्यवसायिक मीटर घेण्यात आलेले नव्हते.

– घरगुती विद्युत मीटरवर दुकान आणि घराचा लोड देण्यात आला होता.

– या इमारतीमध्ये व्हेंटिलेशनसाठी जागा नव्हती.

अशी घडली घटना

या इमारतीमध्ये तळमजल्यावर कापड दुकानातील सात शिलाई मशिन आणि इन्व्हर्टरसह इतर विजेवर चालणाऱ्या वस्तू या मीटरवर चालत असल्याने मीटरवरील वीजभार वाढला. त्यामुळे मीटरमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले आणि कापड दुकानाला आग लागली. सदर इमारतीच्या खिडक्या बंद असल्याने व व्हेंटिलेशनसाठी जागा नसल्याने आगीचे लोळ उठले आणि धूर होऊन आगीचे लोळ जिन्याद्वारे पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत गेले. यात दुसऱ्या मजल्यावरील सात जणांचा बळी गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed