• Sat. Sep 21st, 2024
पुण्यात मतदार केंद्र बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा; नऊशे अधिकारी, दहा हजार कर्मचारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ९३० अधिकारी आणि साडेदहा हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा संवेदनशील मतदार केंद्रांसाठीही विशेष बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. हे प्राथमिक नियोजन असून, प्रत्यक्ष मतदानाच्या पंधरा दिवस आधी आवश्यकतेनुसार बंदोबस्तामध्ये बदल करण्यात येऊ शकतो.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यापासून निवडणुकीच्या वातावरणात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, दुसरीकडे जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेकडूनही चोख व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात आहे. निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रामुख्याने पुणे लोकसभेसह शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा काही भाग येतो. त्यामुळे पोलिसांनी दोन टप्प्यात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
कापूस, तुरीचे दर कडाडले, ९ हजारांचा उच्चांक गाठणार?
पहिल्या टप्प्यात (सात मे) बारामतीचे मतदान होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला संपूर्ण खडकवासला विधानसभा संघ आणि पुरंदर विधानसभेचा काही भाग पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. या मतदानाच्या दिवशी ३७० पोलिस अधिकारी, साडेतीन हजार पोलिस कर्मचारी, ४७५ होमगार्ड, निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात (१३ मे) पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेचा भाग आहे. या दिवशी ५६० पोलिस अधिकारी, सात हजार पोलिस कर्मचारी, १९०० होमगार्ड, निमलष्करी दलाच्या तीन कंपन्या आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त असणार आहे.

जिल्ह्यात २३ केंद्रे संवेदनशील

जिल्ह्यात २३ संवेदनशील मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी १० संवेदनशील केंद्र पुणे लोकसभा मतदारसंघात आहेत. या मतदान केंद्रांवर निमलष्करी दलाचे पाच कर्मचारी आणि शहर पोलिसांचे दोन कर्मचारी असा अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

लोकसभेची यंदाची निवडणूक ही तणावपूर्ण राहण्याची शक्यता पोलिस दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला धार्मिक तणाव, महापालिकास्तरापर्यंत घसरलेली ही निवडणूक पुणे आणि परिसरात चर्चेचा विषय ठरणारी आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed