• Sat. Sep 21st, 2024

राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?

राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?

मुंबई : उष्म्याचा तडाखा सामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्यात राज्यात २३ जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील एकाचा समावेश असून, मुंबईमध्ये मात्र एकही नोंद नाही.

अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नांदेड, सातारा, ठाणे येथे एका व्यक्तीला, तर बुलढाणा, बीड, कोल्हापूर, पुणे, रायगड येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मार्च महिन्यात एकूण २३ जणांना वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघातामुळे २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक म्हणजे १३ मृत्यूंची नोंद ही औरंगाबाद जिल्ह्यात झाली होती.

स्थिती काय?

० यंदा १ ते २० मार्च या कालावधीत उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात सर्वाधिक म्हणजे चार रुग्ण हे बीड जिल्ह्यातील होते. त्यापुढील आठ दिवसांत म्हणजे २८ मार्चपर्यंत आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. या कालावधीत एकाही रुग्णमृत्यूची नोंद नाही.

० राज्यात २०२०-२१ मध्ये उष्माघातामुळे एकही मृत्यू झालेला नाही. २०१६ मध्ये १९ तर २०१७ मध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ नंतर मात्र हे प्रमाण कमी झाले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे दोन आणि नऊ रुग्णांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
महाराष्ट्राला उष्माघाताच्या ‘झळा’, पंधरा दिवसांत १३ रुग्णांची नोंद, लक्षणं काय? कशी काळजी घ्यावी?
काळजी घ्या…

उष्णतेशी निगडित आजारांच्या औषधांची उपलब्धता रुग्णालयामध्ये ठेवावी. उष्माघाताचा त्रास झालेला रुग्ण येताच त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करावेत. उच्चरक्तदाब, मधुमेह यासारखे सहआजार असलेल्यांसह लहान मुले, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे.
कडक उन्हामध्ये बाहेर पडताना काळजी घ्या, दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असताना गरज असेल तरच बाहेर पडा असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

त्रास काय?

थकवा, चक्कर येणे, उत्साह न वाटणे, अस्वस्थता वाढणे, श्वास घेण्यात त्रास होणे, जीभ आतमध्ये ओढल्यासारखी होणे, रक्तदाब वाढणे, शुद्ध हरपणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed