मातृभाषेचा अभिमान हवा : लंके यांचे विखेंना प्रतित्युत्तर
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंग्रजीतून भाषण करण्यासाठी दिलेल्या आव्हानाला नीलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना लंके म्हणाले, ‘माझ्या समोरच्या उमेदवाराने इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे’.
‘इंग्रजीतून बोलणे महत्वाचे नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसदेत मराठी माणसाचा आवाज उठविला. आपल्या जिल्ह्यातील दिवंगत नेते बबनराव ढाकणे यांचेही शिक्षण कमीच होते. त्यांनी बीडचे जिल्ह्याचे नेतृत्व करताना संसदेत मराठीचा झेंडा लावला होता’ असा इतिहास सांगून सुजय विखे यांना लंके यांनी आरसा दाखवला.
नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. काही जण फक्त रिल्स करून काम केल्याचा आव आणतात,’ असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत आमदार संग्राम जगताप यांनी दाखवली. यामध्ये डॉ. विखे पाटील यांनी संसदेत इंग्रजीतून केलेल्या भाषणांचाही समावेश होता. हा धागा पकडून डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘मी जेवढे इंग्रजी बोलेण तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’
दोन्ही उमेदवारांचे शिक्षण किती?
डॉ. सुजय विखे पाटील न्यूरोसर्जन आहेत. काही काळ त्यांनी प्रॅक्टिसही केली.
लंके यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यानंतर त्यांनी आयटीआय अभ्यासक्रम केला आहे. अलीकडेच त्यांनी मुक्त विद्यापीठातून बीए ची पदवी घेतली असून एका संस्थेने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक लंके यांचा डॉक्टर असा उल्लेख करतात.