नवरा आमदार आणि बायको खासदार… फक्त पैसा आणि सत्तेचा माज
बच्चू कडू म्हणाले, “नवरा आमदार आणि बायको खासदार… कारण काय तर सत्ता आणि पैसा म्हणून ना… आम्ही काय फक्त मतदान करायचं का? हा निकाल जेव्हा येईल, तेव्हा जनता नक्की बघेन पैसा नही चलेगा, नेतागिरी नहीं चलेगी… राणा दाम्पत्य हळदी कुकुंचा कार्यक्रम घेतायेत, त्याचवेळी केंद्र सरकारने बंद केलेल्या मिलमधला कामगार आत्महत्या करतोय. हे होऊ नये, म्हणून आपल्या मतदान करायचं आहे”
पियुष गोयलांना मस्ती, त्यांच्याकडे गेलो तर त्यांचं उचकटलं नाही
निर्यातबंदीचा प्रश्न घेऊन वाणिज्य मंत्री पियुष गोयलांकडे गेलो तर त्यांची मस्ती बघायला मिळाली, ते तोंड उचकटायला तयार नाही. अशा लोकांना आता सत्तेत बसवायचे नाही, असे बच्चू कडू म्हणाले. आपल्याला मुद्द्यावर बोलणारे लोक हवेत. धर्मावर बोलणारे अनेक लांडगे तुम्हाला दिसतील, मुद्द्यांवर बोलणारी औलाद निर्माण करायची आहे, असेही ते म्हणाले.
आम्ही तुमचे गुलाम होणार नाही
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, माझ्या पोटाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कृषीचा प्रश्न आहे, कुठे आहे केंद्र सरकार? कांद्याची निर्यातबंदी केली, संत्र्याचे भाव पडले, एकही खासदार दिल्लीच्या तख्तावर आवाज उठवत नाही. संत्र्याचे आयात निर्यातीचे धोरण बिघडलंय. आमदार-खासदाराचा वेळेवर पगार वेळेवर होतोय, मजुराचा पगार तीन महिन्यांनंतर… परंतु त्यावेळी लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. पक्षाची गुलामी फक्त… बोललं तर तिकीट भेटणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे, आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे, आम्ही तुमचे गुलाम होऊ शकत नाही, आम्ही सर्वसामान्य जनचेचे गुलाम होऊ शकतो विधानसभेत डरकाळी फोडतो, लाज लज्जा काढतो आम्ही…
काल एक चिठ्ठी आली, जास्त बोलाल तर…
काल एक चिठ्ठी आली, जास्त बोलाल तर आतमध्ये जाल, उखडून फेकेन… मी म्हटलं तुझ्या बापाला पाठवून दे… आजाबिजा (आजोबा) कोण असेल तर… माझ्या नावावर शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी ३५० गुन्हे आहेत, ११५ वेळा रक्तदान केलंय, पट्टा घालून नेता झालो नाही, मी कार्यकर्ता आहे. ही लढाई सन्मानासाठी आहे. आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी केजरीवालांसारखं जेलमधून ओरडू…. असेही कडू म्हणाले.