• Mon. Nov 25th, 2024
    विद्यार्थ्यांसाठी मतदार मित्र आंतरवासियता, निवडणुकीबाबत जनजागृती करण्याचा उपक्रमाचा उद्देश

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मतदान प्रक्रियेतील तरुणांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी मतदार मित्र आंतरवासियता उपक्रम राबविण्यात येत आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार असून, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयांतर्गत या विद्यार्थ्यांना मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवावे लागणार आहेत.निवडणुकीच्या कार्याची तरुणांना माहिती देणे, तरुणांमधील नेतृत्व गुणाचा विकास करणे, विविध ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या आंतरवासियतेचा कालावधी किमान तीन महिने असणार असून, या कालावधीत आंतरवासियता उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात पूर्णवळ सहभागी व्हावे लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना अन्य कोणतेही काम करता येणार नाही.
    लाचखोरीत नाशिक विभाग आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकले मागे, ३ महिन्यांत ‘इतके’ लाचखोर अटकेत

    राष्ट्रीय सेवा योजनेच्या किंवा महाविद्यालयातील पथनाट्य समूहातील विद्यार्थ्यांना यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. मतदार नोंदणी, मतदार भेटी, पथनाट्ये, समाज माध्यमांसाठी विविध पोस्ट तयार करणे, सामाजिक संस्थांशी समन्वय साधणे, निवडणुकीच्या काळात स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणे अशा जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठ किंवा महाविद्यालयाकडे अर्ज करावा लागणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या अर्जाचा नमुनाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नसून, सहभागी विद्यार्थ्यांना आंतरवासियता पूर्ण केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

    नियम पाळणे बंधनकारक

    या आंतरवासियता उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवास व निवासाची सोय स्वत: करावी लागणार असून, काही अपरिहार्य कारणांमधुळे आंतरवासियता पूर्ण करणे शक्य नसल्यास त्याची लेखी पूर्वसूचना निवडणूक कार्यालयाला देणे आवश्यक असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *