• Mon. Nov 25th, 2024

    Pune News: पोलीस स्टेशनमध्येच दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतले पेट्रोल अन् तेवढ्यात…

    Pune News: पोलीस स्टेशनमध्येच दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतले पेट्रोल अन् तेवढ्यात…

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा : लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांना वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. लोणीकंद पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा करण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    लोणीकंद पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाच्या (गुन्हे) हप्तेखोरीला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला, असा आरोप संबंधित तरुणांनी केला आहे. सत्यवान हौशीराम गावडे (वय ३४) आणि राम अशोकराव गजमल (वय २२, रा. उबाळेनगर, वाघोली) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उबाळेनगर परिसरात गावडे याच्या मालकीचे ‘न्यू प्यासा हॉटेल अँड बार’ आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवत असल्याने निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांनी सोमवारी पहाटे अडीच वाजता गावडेवर कारवाई केली. त्या रागातून गावडे आणि गजमल यांनी सोमवारी सायंकाळी लोणीकंद पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. त्यानंतर बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.’

    दर महिन्याला १० हजार हप्ता?

    माझे हॉटेल आणि बार अधिकृत असूनही लोणीकंद पोलिस ठाण्याच्या निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे हॉटेल सुरू ठेवायचे असल्यास दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करीत होत्या. हप्ता देत नसल्याने हॉटेलवर जाणूनबुजून कारवाई करून त्रास दिला जात होता. त्यांच्या कारवाईला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप हॉटेलचालक सत्यवान गावडे यांनी केला आहे.

    ढाकणेंचा प्रतिक्रियेस नकार

    गावडे यांनी पोलिस हप्ता मागत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला. सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना कारवाईची भीती दाखवून पैसे आणि हप्ते उकळणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावडे यांनी केली. दरम्यान, याविषयी निरीक्षक ढाकणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
    पालकांनो, अल्पवयीन मुलांना गाडी देताय? मग कारवाईला तयार राहा, पुणे पोलिसांकडून कारवाई सुरु
    ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती टळली

    पोलिस तक्रारीची दखल घेत नसल्याने फेब्रुवारी महिन्यात एका तरुणाने वाघोली पोलिस चौकीत पेटवून घेतले होते. त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती लोणीकंद पोलिस ठाण्यात थोडक्यात टळली. त्यामुळे लोणीकंद पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी पहाटे कारवाई केली. त्यामुळे चालकाने आणि कामगाराने सोमवारी सायंकाळी लोणीकंद पोलिस ठाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हप्ता मागितल्याचा आरोप हॉटेलचालकाने केला आहे. त्याचा जबाब नोंदवून घेतला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.- विजय मगर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed