म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी व प्रामुख्याने उन्हाळ्यातील पाणी समस्या संपुष्टात आणण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आलेली ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी मंगळवारी सुरू करण्यात आली. ‘जायकवाडी’हून दुपारी तीन वाजता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आणि त्यानंतर २४ तासांत वाढीव पाणी शहरात येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. त्यामुळे, लवकरच पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्याचे नियोजनही केले जाणार आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ९०० मिलिमीटर व्यासाची पाणीपुरवठा योजना नव्याने तयार करण्यात आली. ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूने ९०० मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. सुमारे एक महिन्यापासून या जलवाहिनीच्या चाचणीचे काम सुरू होते. अखेर हे काम मंगळवारी पूर्ण झाले आणि दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ‘जायकवाडी’हून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
समान पाणीपुरवठ्याचा प्रयत्न
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढून शुद्धीकरण केलेले पाणी नक्षत्रवाडी येथील ‘एमबीआर’मध्ये (संतुलित जलकुंभ) आणून त्यानंतर त्याचे वितरण शहरात केले जाणार आहे. या ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून सुरुवातीच्या काळात सुमारे २२ ते २५ एमएलडी वाढीव पाणी मिळणार आहे.
शहरासाठी सध्या सुमारे १३० ते १३५ एमएलडी पाणी मिळते, त्यात २२ ते २५ एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. वाढीव पाण्यामुळे पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली. सुरुवातीला शहरातील सर्व वसाहतींना समान पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे, त्यानंतर गॅप कमी करण्याच्या दृष्टीने काम केले जाणार आहे.