मुंबई: मुंबईत दिवसाचे तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान असले तरी हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, दिवसाच्या तुलनेत रात्रीची आर्द्रता अधिक असल्याचं नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील आर्द्रतेचे प्रमाण रात्रीच्या वेळी ७६ टक्के, तर दिवसा ६२ टक्के नोंदवले गेले आहे. हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, दिवसा जास्त तापमान असल्याने आर्द्रता नाहीशी होते आणि हवेतील आर्द्रतेचं प्रमाण हे रात्रीच्या तुलनेत कमी असते. तर रात्रीच्या वेळी आर्द्रता वाढते. अधिक उकाडा जाणवते, खूप घाम येऊ लागतो आणि अस्वस्थ वाटू लागतं.
मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. ८ एप्रिलपर्यंत मुंबईचे दिवसाचे तापमान ३५ अंश, तर रात्रीचे तापमान २४ अंशांवर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
२३ जण उष्माघाताचे बळी
महाराष्ट्रात गेल्या २८ दिवसांत २३ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक ३, रायगड, पुणे, बीड, बुलढाणा आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड आणि सातारा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
उष्माघाताने एकाचा मृत्यू
माराठवाड्याच्या पैठण येथे ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती आहे. पण, आरोग्य विभागाकडून याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.