• Sat. Sep 21st, 2024
हक्काच्या कार्यकर्त्याची घरवापसी अजितदादांच्या जिव्हारी; नगरमध्ये नव्या शिलेदाराची विखेंना साथ

अहमदनगर: पक्ष फुटीच्यावेळी सोबत आलेल्या हक्काच्या कार्यकर्त्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर घरपासी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी नवा चेहरा अध्यक्ष म्हणून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) जिल्हा मेळावा ४ एप्रिलला नगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाट या दुसऱ्या हक्काच्या शिलेदाराची अजित पवारांनी नियुक्ती केल्यानंतर होणारा हा पहिलाच मेळावा आहे.
रमेश कदमांची एन्ट्री, सोलापूरमध्ये धाकधूक वाढली, राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंना टेन्शन
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. आता तेच या मतदारसंघातील उमेदवार आहेत. पवार कुटुंब आणि विखे पाटील कुटुंब यांच्यात पारंपरिक राजकीय वैर आहे. त्यामुळे पवारांनी लंके यांना पुढे करून विखे पाटील यांच्या विरोधात डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता अजित पवार महायुतीसोबत आहेत. त्यामुळे त्यांनी विखे पाटील यांच्यासाठी मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे. लंके यांना थांबविण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले असले तरी त्यांना यश आले नाही. त्यामुळे ही गोष्ट जिव्हारी लागल्याने अजित पवार यांनी नगर जिल्ह्यात लक्ष घातले आहे.महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. त्यासाठीच ४ एप्रिलला केडगाव येथे सकाळी दहा वाजता मेळावा आयोजित केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाट यांची आता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनीच पुढाकार घेत मेळावा आयोजित केला आहे.

महायुतीत नाशिकच्या जागेवरून वरून पेच, भुजबळांची नरमाईची भूमिका?

या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed