• Sat. Sep 21st, 2024
रमेश कदमांची एन्ट्री, एमआयएम नेत्यांची भेट घेतली, सोलापुरात कुणाची मतं खाणार?

इरफान शेख, सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वंचितच्या उमेदवारामुळे रंगत आलेली असताना पुन्हा एकदा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची धाकधूक एमआयएमने वाढवली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत फक्त भाजप आणि काँग्रेस अशी लढत होईल की काय अशी परिस्थिती असताना वंचित आणि एमआयएममुळे निवडणुकीला आणखी रंग चढणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि उसतोड मजुराचा मुलगा असे पाहिले जात आहे. या दोघांच्या लढाईत माजी आमदार रमेश कदमांची एन्ट्री झाली आहे. तुरुंगात असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जवळपास २४ हजार मतांची लीड रमेश कदम यांना मिळाली होती.एमआयएमची पतंग रमेश कदमांनी हाती घेतली तर कुणाची दोरी कापतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे.

रमेश कदम आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांत गोपनीय चर्चा

मंगळवारी सकाळी हॉटेल बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची आणि रमेश कदम यांच्यात गोपनीय बैठक झाली. एमआयएमच्या एका विश्वनीय पदाधिकाऱ्यांनी याची माहिती देताना सांगितले की, आम्ही एकूण चार जणांची इच्छुक यादी हैद्राबादचे खासदार तथा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठवली आहे. रमेश कदम यांचे देखील नाव त्यांना पाठविले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट; एमआयएमचा उमेदवार शड्डू ठोकणार, उमेदवारीसाठी तिघांचा अर्ज

एमआयएम लवकरच सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राखीव उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती एमआयएमच्या एका वरीष्ठ नेत्याने माहिती दिली आहे. बैठकीत एमआयएमचे अजहर हुंडेकरी, गाजी जहागिरदार, कम्मो शेख यांच्या सह रमेश कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंची डोकेदुखी वाढणार, सोलापुरात सकल मराठा समाज उमेदवार देणार

रमेश कदमांच्या एन्ट्रीने सोलापूरकर थक्क झाले होते

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सुमारे ३१२ कोटींच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम यांची २० ऑगस्ट २०२३ रोजी जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांचे मोहोळ परिसरात झालेले जंगी स्वागत, त्यात तरूणाईचा एखाद्या उत्सवासारखा दिसलेला सहभाग थक्क करणारा होता.
वंचितचा मविआला धसका; कोणकोणत्या जागांवर बसू शकतो फटका? काय सांगते आकडेवारी?

२०१४ साली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ राखीव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले रमेश कदम हे मूळचे माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील आहेत. जवळपास आठ वर्षे तुरूंगात राहून जामिनावर सुटल्यानंतर कदम यांचे मोहोळच्या तरूणाईने वाजतगाजत जल्लोषात केलेले स्वागत केले होते.

सुशीलकुमार शिंदेंचा माईंड गेम; प्रणिती शिंदेंना अधिकची १ लाख मतं देणार, दिलीप मानेंमुळे नवचैतन्य

रमेश कदमांना उमेदवारी मिळाली प्रस्थापितांना फटका

मोहोळ तालुक्यात माजी आमदार रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एमआयएमकडून रमेश कदम यांना सोलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळाली तर मोहोळ तालुक्यातून भाजप आणि काँग्रेसला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात आमदार असताना रमेश कदमांच्या धडाकेबाज निर्णय आक्रमकता आणि काम करण्याची विशिष्ट शैली यामुळे युवा वर्गात रमेश कदमांनी स्थान निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed