• Sat. Sep 21st, 2024
उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, जिथे ४ आमदार सोडून गेले तिथे खासदारच गळाला लावला!

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. यंदा लोकसभेचे तिकीट कापलेले भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मंगळवारी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. खासदार पाटील उद्या शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश करण्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दरम्यान, उन्मेष पाटलांसह जिल्ह्यातील भाजपाचे दोन पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत जाणार आहेत.जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट यंदा कापण्यात आले. त्यांच्याऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपतील अंतर्गत गटबाजी व आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी असलेला कलह यामागे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
भाजपला मोठा धक्का, विद्यमान खासदार मुंबईत राऊतांच्या भेटीला, शिवबंधन बांधण्याच्या चर्चा

राऊतांची भेट घेऊन पक्षप्रवेशाचा मुहूर्त काढला

काही दिवसापूर्वी उन्मेष पाटील नॉट रिचेबल असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याबरोबरच त्यांच्या पत्नी संपदा उन्मेष पाटील यांनी मतदार संघात दौरे सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर उन्मेश पाटील यांनी आज मंगळवारी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची मुंबईतील निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरे गटात प्रवेशाची प्राथमिक चर्चा झाली आहे. खासदार पाटील ठाकरे गटात प्रवेश करून खासदारकी लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
नाराज भाजप खासदारांची पत्नी मशाल हाती घेणार? ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

भाजपला धक्का, पदाधिकारीही ठाकरेंकडे जाणार

दरम्यान, उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील ठाकरे गटात उद्या बुधवारी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथराव खडसेंच्या सोबत आले नव्हते. तेवढे कार्यकर्ते भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील, असा विश्वास देखील उन्मेश पाटील यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
खान्देशात आघाडीची उमेदवारी देण्यात पिछाडी; जळगाव, रावेर व धुळ्यात ‘नवरदेवा’ विना आघाडीचे वऱ्हाड संभ्रमात

मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतली : उन्मेष पाटील

संजय राऊत हे युतीचे ज्येष्ठ नेते होते. तसेच ते ज्येष्ठ खासदार व संपादक आहेत. त्यांच्यासोबत मी ५ वर्षे खासदार म्हणून काम केले आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे. राजकारणापलीकडील ही भेट आहे, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी भेटीनंतर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed