शिंदे परिवाराने हिशोब द्यावा : राम सातपुते
सोलापूर लोकसभा उमेदवार म्हणून राम सातपुतेंची घोषणा होताच सातपुते हे सोलापुरात दाखल झाले. राम सातपुते यांनी सोलापुरात येताच सुशीलकुमार शिंदेंना फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. आजतागायत शिंदेनी कमावलेली अफाट संपत्तीचा हिशोब द्यावा अशी मागणी करत राम सातपुते हे शिंदे परिवारावर तुटून पडले. सातपुते यांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रणिती शिंदे यांनी शेवटी मी उमेदवार आहे, माझे वडील नाहीत, अशी आठवण त्यांना करून दिली. तरीदेखील राम सातपुते हे ऐकायला तयार नाहीत. उलट उपरा, पट्टेवाला, आतंकवाद्यांना मदत करणारे मुख्यमंत्री असे आरोप करत आहेत. त्यावर काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रत्युत्तर देत राम सातपुतेंचं संतुलन बिघडले आहे, अशी टीका केली.
चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा राम सातपुतेच्या नावावर करतो
भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप करत, शिंदे यांचे दक्षिण आफ्रिकेत चहाचे मळे आहेत असे म्हटले. त्यावर सोलापूर काँग्रेसच्या वतीने राम सातपुते यांना चॅलेंज दिले आहे. भाजपने शिंदेचे दक्षिण आफ्रिकेतील चहाचे मळे दाखवावे किंवा त्याबाबत कागदपत्रे दाखवावीत. ते चहाचे मळे थेट राम सातपुते यांच्या नावावर करू असे जाहीररीत्या सांगितले आहे.