म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली असून, या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेने तयारीदेखील केली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी यंदाचा गुढीपाडवा गोड होणार असल्याचे संकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले आहेत.उन्हाळ्यात शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन, जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले, की ‘या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. नक्षत्रवाडी येथील एमबीआरपर्यंत (संतुलित जलकुंभ) चाचणीमध्ये कोणताही व्यत्यय आलेला नाही. एमबीआरमध्ये पाणी पडू लागले आहे. त्यामुळे थोडेफार शिल्लक राहिलेले काम करून घेऊन, एप्रिल महिन्याच्या पहिला आठवड्यात किंवा त्यानंतर एक-दोन दिवसांत नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहरासाठी पाणीपुरवठा सुरू केला जाईल. गुढीपाडव्याच्या अगोदरच पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे शहरवासीयांचा यंदाचा गुढीपाडवा गोड होईल.’
सुरुवातीला २५ एमएलडी पाणी वाढवून मिळेल. त्यानंतर जायकवाडी येथे पूर्णक्षमतेने पंपहाऊस सुरू झाल्यावर ७० ते ७५ एमएलडी पाणी वाढून मिळेल असे मानले जात आहे. त्यामुळे उन्हाळा पाण्याच्या दृष्टीने सुखाचा जाईल, असा दावा केला जात आहे. वाढीव पाण्याच्या वितरणाचे नियोजन महापालिकेची यंत्रणा करणार आहे.

हर्सूल तलावात सात फूट पाणी
जुन्या शहरातील १४ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात सात फूट पाणी शिल्लक आहे. हे पाणी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवण्याचे आव्हान पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. हर्सूल तलावातूनदेखील वाढीव पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.