• Mon. Nov 25th, 2024
    राजन विचारेंच्या निष्ठेचा विजय होणार की शिंदेंचे उमेदवार बाजी मारणार, ठाण्यात प्रतिष्ठेची लढत

    ठाणे: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या ठाण्यातील लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. स्वांतत्र्योत्तर काळानंतर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर पुढे काही वर्षे भाजपची पकड होती.

    मात्र, १९९६ साली येथे फडकलेला शिवसेनेचा झेंडा आजतागायत कायम आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे राजन विचारे हे मोदी लाटेत निवडून आल्याची चर्चा नेहमी होत असताना, यंदाही विचारे यांनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रिंगणात उतरवले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने विचारे यांच्या विरोधात अद्याप उमेदवार निश्चित केलेला नाही. हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपच्या वाट्याला जाणार, याबाबतही शिक्कामोर्तब झालेले नाही.
    राजकारण: कल्याणमध्ये भाजपचे प्राबल्य, मित्रपक्षाचा विरोध तीव्र, शिंदेंसमोर मनोमीलन घडवण्याचं आव्हान

    विधानसभानिहाय दृष्टिक्षेप

    ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामधील कोपरी-पाचपाखाडीचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. तर ओवळा-माजिवडा येथे शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. यासोबत ठाणे शहर येथे भाजपचे संजय केळकर, मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या गीता जैन, ऐरोली येथे भाजपचे गणेश नाईक व बेलापूरमध्ये भाजपच्याच मंदा म्हात्रे आमदार आहेत.

    मागील निवडणुकांची गोळाबेरीज

    गेल्या आठ निवडणुकांची गोळाबेरीज केल्यास २००९ साली झालेल्या एका लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ठाणे लोकसभेवर सलग शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या अभेद्य बालेकिल्ल्याला २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांनी सुरूंग लावला होता. मात्र आता हेच संजीव नाईक भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. तर भाजपच्या रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथ पाटील, राम कापसे यांनी १९७७ ते १९९६पर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९६ साली शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून खेचून आणला. त्यानंतर २००४ पर्यंत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी दिल्लीत ठाणेकरांचे प्रश्न मांडले. त्यांच्या आकस्मिक निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांना पराभूत करून शिवसेनेच्या विजयाची परंपरा कायम ठेवली. विचारे यांनी संजीव नाईक यांचा २०१४ साली मोठ्या फरकाने पराभव करत पुन्हा ठाणे लोकसभेवर भगवा फडकवला. २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निकालांमध्ये शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचा अनुक्रमे २ लाख ८१ हजार २९९ व चार लाख १२ हजार १४५ इतक्या मोठ्या मताधिक्याने झालेला विजय ‘मोदी लाटे’चा करिष्मा असल्याचे अधोरेखित करतो. त्यामुळे यंदा विचारे हेच मविआचे उमेदवार असल्याने त्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

    मी ऐकत नव्हतो, म्हणून मुख्यमंत्री रागावले; एका फोननंतर विजय शिवतारेंचं बंड झालं थंड, बारामतीतून माघार

    यंदाच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात येणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. तर शिंदे गटाचा खासदार नसल्याने हा मतदारसंघ आता पुन्हा भाजपच्या पदरात पाडून घेण्यासाठी स्थानिक नेतेमंडळी आग्रही आहेत. त्यात शिंदे गटाकडे ही जागा गेल्यास ठाकरे गट निवडणुकीचा प्रचार ‘निष्ठा’ या हुकुमी मुद्द्याकडे केंद्रित करण्याची शक्यता ओळखून भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरुवातीपासूनच मतदारसंघातील दौरे व गाठीभेटींवर जोर दिला आहे.

    हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यास वर्षानुवर्षे शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ भाजपने खेचून नेल्याचा प्रचार ठाकरे गटाकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांसमोर हे भावनिक कार्ड खेळण्याची संधी ठाकरे गटाला मिळू नये, यासाठी शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख व ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के व माजी आमदार रवींद्र फाटक हे ठाणे लोकसभेचे तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. तसेच शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ऐनवेळी रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. यापलीकडे संजीव नाईक यांना शिंदे गटात घेऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवण्याचीही खेळी महायुतीकडून होण्याची चिन्हे आहेत.

    thane lok sabha

    प्रचारातील प्रमुख मुद्दे

    यंदाच्या प्रचारात राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच राज्यातील राजकारणासह स्थानिक मुद्द्यांभोवती निवडणुकीचा प्रचार फिरण्याची शक्यता आहे. ठाण्यावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम व आनंद दिघे यांचे ठाणेकरांमधील स्थान यावरून शिंदे आणि ठाकरे गट रान पेटवण्याची शक्यता आहे. एकीकडे विद्यमान खासदार राजन विचारे ठाणे रेल्वे स्थानक आणि त्यातील सोयीसुविधा, दिघा गाव रेल्वे स्थानक, ऐरोली-काटई मार्ग, रो-रो सेवा या कामांची जंत्री मांडत असताना प्रचारात या कामांवरून श्रेयवादाची लढाई रंगू शकते. केंद्र सरकारच्या मदतीनेच हे प्रकल्प मार्गी लागले, असा प्रचार महायुतीकडून होण्याची चिन्हे आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *