• Sat. Sep 21st, 2024
उत्तर-पूर्व मुंबईत मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दीना पाटील, भाजप-उबाठामध्ये चुरशीची लढत अपेक्षित

मुंबई: लोकसभेच्या मुंबईतील उत्तर-पूर्व जागेवर गेल्या सलग दोन निवडणुका भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या या जागेवर यंदा भाजपतर्फे मुलुंड येथून आमदार असलेल्या मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून संजय दीना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाटील हे २००९ साली या मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र त्यानंतर मोदी लाटेमुळे पाटील यांना मोठा पराभव पत्करावा लागला. भाजपचा उमेदवार घसघशीत मतांनी विजयी झाला आहे. मराठी, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम यांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची होईल यात काहीच शंका नाही.

उत्तर-पूर्व मुंबई या लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती ही मानखुर्द पश्चिमपासून थेट मुलुंडपर्यंत आहे. या मतदारसंघात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम आणि मानखुर्द-शिवाजीनगर असे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. उत्तर-पूर्व मुंबईतील मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि भांडुप, विक्रोळीतील काही भाग सोडल्यास बहुतांशी भाग हा बैठ्या वस्त्यांचा आणि झोपडपट्टीचा आहे. २०१९च्या निवडणुकीत नऊ लाख मतदारांनी मतदान केले होते.

सामाजिक समीकरण

उत्तर-पूर्व मतदारसंघात एकूण १६ लाख चार हजार १५३ मतदार आहेत. यातील ८.६१ लाख पुरूष तर ७.४२ लाख महिला मतदार आहेत. २०११च्या जनगणनेनुसार मतदारसंघात १.२८ लाख मतदार (८ टक्के) अनुसूचित जातीचे मतदार असून २.५९ लाख मतदार (१६.२ टक्के) मुस्लिम समुदायातील आहेत. मतदारसंघात गुजराती-मारवाडी समाजाचा टक्काही लक्षणीय असून मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम आणि भांडुप या मतदारसंघातील त्यांचे मतदान निर्णायक ठरते. २०१४ साली या मतदारसंघात ५१ टक्के मतदान झाले होते तर २०१९ साली यात वाढ होऊन ५७ टक्के मतदान झाले.
युतीचे प्राबल्य, काँग्रेसची आशा; उत्तर-मध्य मुंबईचा गड भाजप राखणार की काँग्रेस जिंकणार?

मागील निवडणुकांचे संदेश

२०१९च्या निवडणुकीत भाजपतर्फे त्यावेळी नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. कोटक यांनी ५ लाख १४ हजार ५९९ मते मिळवत विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या संजय पाटील (२ लाख ८८ हजार ११३ मते) यांचा तब्बल २.२६ लाख मतांनी दणदणीत पराभव केला. मात्र, कोटक यांचे मताधिक्य त्यांच्या आधी निवडणूक लढविलेल्या भाजपच्याच उमेदवारापेक्षा कमी होते. २०१४ साली हीच जागा भाजपने ६० टक्के मते मिळवत जिंकली होती. त्याही वेळेस राष्ट्रवादीतर्फे पाटीलच उमेदवार होते. मोदी लाटेवर स्वार असलेल्या किरीट सोमय्या यांनी ५.२५ लाख मते मिळवली होती, तर त्यांच्याविरोधात उभे राहिलेल्या पाटील यांना त्यावेळी २.०८ लाख मते मिळाली होती.

विधानसभा मतदारसंघांचे चित्र

२०१९च्या विधानसभा निकालाकडे पाहिल्यास मुलुंड (भाजप – मिहीर कोटेचा), विक्रोळी (शिवसेना – सुनील राऊत), भांडुप – पश्चिम (शिवसेना – रमेश कोरगावकर), घाटकोपर – पश्चिम (भाजप – राम कदम), घाटकोपर – पूर्व (भाजप – पराग शहा) आणि मानखुर्द -शिवाजी नगर (सपा – अबू आझमी) हे विजयी झाले होते. गेल्या दोन निवडणुकांची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिल्यास दिसून येते, की भाजपला मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम आणि काही अंशी भांडुप मतदारसंघातून आघाडी मिळते, तर गेल्या तीनही निवडणुकांमध्ये उभे असलेल्या संजय पाटील यांना विक्रोळी आणि मानखुर्द-शिवाजीनगर येथून जास्त मते मिळत असल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेची भिस्त

उत्तर-पूर्व मुंबईतून निवडून येणाऱ्या उमेदवारांची भिस्त ही नेहमीच मराठी आणि मुस्लिम मतांवर राहिली आहे. विक्रोळी मतदारसंघातील दलित मतदार, घाटकोपर पूर्व मतदारसंघातील माता रमाबाई आणि गारोडिया नगर, मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातील मराठी आणि मुस्लिम मतांवर शिवसेनेला विसंबून राहावे लागणार आहे. याच भागात शिवसेना (उबाठा)चे प्रवक्ते संजय राऊत राहतात, त्यामुळे ते उमेदवारासाठी किती मैदानात उतरतात आणि मते खेचून आणतात, यावर त्यांचीही प्रतिष्ठा अवलंबून आहे.

पाटील यांनी २००९पासून या मतदारसंघात निवडणूक लढवली असून, प्रथम ते विजयी झाले, तेव्हा त्यांना २.१३ लाख मते होती. त्यामागील कारण मनसेच्या शिशिर शिंदे यांनी खेचलेली १.९५ लाख मते. त्यानंतरही पाटील यांना २०१४च्या निवडणुकीत २.०८ लाख आणि २०१९च्या निवडणुकीत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक २.८८ लाख मते मिळाली. राष्ट्रवादीकडून दोन निवडणुका लढविल्यानंतर पाटील आता शिवसेनेकडून निवडणूक लढविणार आहेत. संजय पाटील हे जवळपास दोन दशके या भागात कार्यरत आहेत. परंतु, गेले काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून काही अंतर ठेवून होते. आता उमेदवारीच्या निमित्ताने ते पुन्हा मैदानात उतरले आहेत.

भाजपला विश्वास

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार हा नेहमीच भाजपच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला आहे. मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या मतदासंघात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य आहे. त्यांच्याकडून एकगठ्ठा मते भाजपच्या उमेदवाराला पडतात. यंदाही ती त्यांच्या पाठीशीच उभी राहतील, यात काही शंका नाही. सध्याचे उमेदवार मिहीर कोटेचा हे विद्यमान आमदार आहेत. सतत जनतेच्या संपर्कात असणारे आणि मदतीला धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे.

टीका बघून काम केलं तर मला कामच करता येणार नाही, माझ्या निर्णयात सत्याचाच रंग होता | राहुल नार्वेकर

तिसऱ्या उमेदवाराची शक्यता

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, असे जाहीर केल्याने ते या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संपूर्ण मतदारसंघात दलित मतदारांची संख्या पाहता वंचितचा उमेदवार उभा राहिल्यास त्याचा सरळ फटका मविआला बसण्याची शक्यता आहे.

lok sabha

मतदारसंघातील समस्या

प्रकल्पबाधितांसाठी सुमारे ६५०० घरे मुलुंड पूर्व येथे उभारण्यात येणार असून, त्यावरून स्थानिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे. त्यातच धारावी पुनर्वसन प्रकल्पबाधितांनाही याच परिसरातील मिठागरांची जागा मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतही स्थानिकांमध्ये रोष आहे. येथे नागरी वस्ती वाढल्यास आधीच पाणी आणि कचऱ्याच्या समस्यांनी त्रस्त असलेले नागरिक आणखी हवालदिल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed