• Mon. Nov 11th, 2024

    राजकारण: कल्याणमध्ये भाजपचे प्राबल्य, मित्रपक्षाचा विरोध तीव्र, शिंदेंसमोर मनोमीलन घडवण्याचं आव्हान

    राजकारण: कल्याणमध्ये भाजपचे प्राबल्य, मित्रपक्षाचा विरोध तीव्र, शिंदेंसमोर मनोमीलन घडवण्याचं आव्हान

    राजलक्ष्मी पुजारे, कल्याण: कल्याण लोकसभा मतदार संघावर सन २००९ म्हणजेच सुरुवातीपासूनच शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनवेळा खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याने हा मतदारसंघ ठाकरे गटाने प्रतिष्ठेचा केला आहे. या मतदारसंघातून निष्ठावान उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच केली असली तरी या निष्ठावानाचा शोध काही संपलेला दिसत नाही.दुसरीकडे खासदार शिंदे यांनी मागील दोन वर्षांपासून लोकसभा मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढताना विकासकामांच्या माध्यमातून मतदारांच्या जवळ पोहोचण्याचा धडाका लावला आहे. विरोधकापेक्षा मित्रपक्षाकडूनच विरोधाची धार तीव्र असल्याने हा विरोध शमवून कार्यकर्त्यांसोबत मनोमीलन घडवण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर असेल. कल्याण लोकसभा हा मिश्र मतदारसंघ असून, कळवा-मुंब्रा भाग हा मुस्लिमबहुल, कल्याण ग्रामीण हा आगरी-कोळी भूमिपुत्र तसेच वारकरी संप्रदायाचा, डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राबल्य असलेला, उल्हासनगर हा सिंधी बांधवांचे प्राबल्य असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या सर्व समाजाच्या मतदारांची मोट बांधावी लागते.
    राजकारण: उत्तर-पूर्व मुंबईत मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दीना पाटील, भाजप-उबाठामध्ये चुरशीची लढत अपेक्षित

    विधानसभानिहाय चित्र

    या मतदारसंघात महापालिका शिवसेनेकडे असल्या तरीही डोंबिवली, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर असे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे (अनुक्रमे आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, कुमार आयलानी), कल्याण ग्रामीण मनसेकडे (राजू पाटील), कळवा-मुंब्रा राष्ट्रवादी शरद पवार गट (जितेंद्र आव्हाड), तर अंबरनाथ हा एकच मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे (बालाजी किणीकर) आहे.

    गेल्या निवडणुकांचे निकाल

    दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेचा कल्याणचा खासदार होण्याची संधी दिली. त्यानंतर २००९मध्ये आनंद परांजपे यांनी (२,१२,४७६) मते मिळवून वसंत डावखरे (१,८८,२७४) यांचा पराभव केला. २०१४च्या निवडणुकीत कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडून अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले होते. त्यांची शिवसेनेशी फारकत घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या आनंद परांजपे यांच्याशी लढत झाली. यावेळी शिंदे यांनी ४,४०,८९२ मते मिळवत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे (१,९०,१४३) यांचा पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाबाजी पाटील यांना मैदानात उतरवले. मात्र, ही लढत सुरुवातीपासूनच एकतर्फी होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५,५९,७२३ मते मिळवून बाबाजी पाटील (२,१५,३८०) यांचा पराभव केला.

    बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, लोकसभेचे तिकीट मिळणार? शिंदेंनी सांगितलं

    सध्याची राजकीय स्थिती

    सध्या राजकीय खेळात भाजप, मनसे आणि शिवसेना शिंदे गट यांची महायुती आहे. तरीही भाजपच्या तिन्ही आमदारांकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कुरबुरी आहेत. कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर कल्याण पूर्व आणि डोंबिवली भाजपमध्ये खदखद आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनीही खासदार शिंदे यांच्या विरोधातील आपली नाराजी अनेकदा पक्षश्रेष्ठींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वत्र व्यक्त केली होती. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते वरवर भासवत असले तरीही कार्यकर्त्यांची नाराजी मतपेटीतून व्यक्त होणार असे खासगीत बोलले जाते.

    यंदा रिंगणात कोण?

    शिवसेनेसह चिन्हावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक जितकी प्रतिष्ठेची आहे तितकीच ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची आहे. मात्र तरीही ठाकरे गटाचा उमेदवार कोण, याच प्रश्नावर गाडी अडली आहे. सुरुवातीला श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ही चर्चा मागे पडल्यानंतर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर माजी आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून भोईर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांचे कल्याण क्षेत्रात दौरे आणि झंझावती भाषणे झाली असली तरी जिल्हाप्रमुख या नात्याने केदार दिघे यांचा कल्याण पूर्व मतदारसंघात फारसा परिचय नसल्याची अडचण आहे.

    thane lok sabha

    प्रचारातील मुद्दे

    कल्याण-डोंबिवली महापालिकेलगतची २७ गावे विकासापासून वंचित राहिली असून, कल्याण पूर्वेच्या असुविधांमुळे मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. कल्याण-डोंबिवली शहरामधील दळणवळणाचा मुद्दा अत्यंत गंभीर असून पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील खराब रस्ते, काँक्रीटीकरणासाठी निधी आला असला तरी धीम्या गतीने सुरू असलेली कामे, निकृष्ट दर्जाची कामे हे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतील. कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाकुर्ली, कोपर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ यांसारख्या रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. ठाण्यात क्लस्टर जाहीर झाले असले तरी या मतदारसंघातील क्लस्टर राबवण्याची प्रक्रिया, महापालिकेच्या प्रशासकीय कारभारातील त्रुटी आणि दर्जाहीन कामांबद्दलही प्रचाराच्या दरम्यान विशेष चर्चा होऊ शकते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed