शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून दिलीप वळसे पाटील यांची ओळख होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जात शरद पवार यांना धक्का दिला होता. त्यामुळे अनेक गोष्टी वेगळ्या झाल्याचे पाहायला मिळाले होते.
एखादी राजकीय व्यक्ती जर आजारी पडली तर त्या व्यक्तीच्या सुख दुःखात सहभागी होण्याची पद्धत आहे. त्यातून राजकीय मतभेद बाजूला ठेवत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. जवळपास १५ ते वीस मिनिटं त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. त्यांना डॉक्टरांनी महिनाभर आरामाचा सल्ला देखील दिलेला आहे. त्यामुळे सध्या वळसे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दरम्यान, शरद पवार यांचा फोन आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही घटना घडली आहे. त्यामुळे वळसे पाटील हे प्रचारासाठी दाखल होणार का ? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.