• Sat. Sep 21st, 2024
अंबादास दानवेंबाबत सस्पेन्स कायम, छत्रपती संभाजीनगर जागेसाठी महायुतीत चुरस

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायमच आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीबद्दल निर्णय होईल ,असे मानले जात आहे.लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खैरे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगरची जागा जशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आली आहे, त्याचप्रमाणे महायुतीमध्येदेखील हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल असे मानले जात आहे. शिवसेनेलाच हा मतदारसंघ सुटावा, यासाठी पक्षाचे नेते प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.

या पक्षातर्फे उमेदवारीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह मराठा आरक्षणाची लढाई न्यायालयात लढणारे विनोद पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चादेखील सुरूच आहे. दानवे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य असून, त्यांना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्यात आले आहे. त्यांच्या पक्षबदलाची चर्चा सुरू झाल्यावर आणि चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही पक्षबदलाची चर्चा सुरू आहे.

पक्षाबाहेरील उमेदवार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाला उमेदवारी दिली तर पक्षाला फायदा होईल याबद्दल चाचपणी करीत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या बाहेरच्या नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed