• Sat. Sep 21st, 2024

सोनेखरेदी करण्याचा बहाणा, ग्राहकांकडून दागिने घेऊन लाखो रुपयांचा गंडा, सेल्स एजंटने कशी केली फसवणूक?

सोनेखरेदी करण्याचा बहाणा, ग्राहकांकडून दागिने घेऊन लाखो रुपयांचा गंडा, सेल्स एजंटने कशी केली फसवणूक?

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाशीतील चेमन्नूर ज्वेलर्स या कंपनीच्या नावाने सोनेखरेदी करण्याच्या बहाण्याने अनेक ग्राहकांकडून आगाऊ रोख रक्कम व दागिने घेऊन कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बालामुरली मेनन या एजंटने एका महिलेलाही नऊ लाख १५ हजार रुपयांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार कामोठे पोलिसांनी मेनन याच्या विरोधात फसवणुकीसह बनावटगिरी तसेच, अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.आरोपी बालामुरली मेनन हा वाशीतील चेमन्नूर ज्वेलर्स या कंपनीत सेल्स एजंट म्हणून काम करत होता. सन २०१७मध्ये बालामुरली याने चेमन्नूर ज्वेलर्समध्ये ‘ऍडव्हान्स फॉर गोल्ड ऑर्नामेंट्स परचेस’ योजनेत पैसे गुंतवल्यास त्यांना एक वर्षानंतर त्याच किमतीचे सोने कंपनीकडून खरेदी करता येणार असल्याचे सांगतिले होते. तसेच, कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे या महिलेने सप्टेंबर २०१७मध्ये ५० हजार रुपये तसेच, २०१९मध्ये ५० रुपये दिले. तेव्हा आरोपीने ज्वेलर्सच्या नावाने दोन बनावट प्रमाणपत्रेही दिली. त्यानंतर महिलेने चार लाख व नंतर एक लाख रुपये योजनेत गुंतवण्यासाठी दिले. मात्र त्याचे प्रमाणपत्र त्याने दिले नाही.
विल्सन जिमखाना वाचविण्यासाठी बैठकांचे सत्र, भूखंड पुन्हा कॉलेजला मिळावा यासाठी माजी विद्यार्थ्यांचा लढा
आरोपीने जुने सोने जमा करून नवीन सोने देण्याची नवी योजना सांगून मेकिंग चार्ज न घेता सोने देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे महिलेने आरोपीला सुमारे तीन लाख १५ हजार रुपये किमतीचे ६३ ग्रॅम वजनाचे सोने आरोपीला दिले. त्याबदल्यात त्यांना जानेवारी २०२३ मध्ये नवीन सोने मिळणार होते. मात्र त्यांना नवीन सोने अथवा पाच लाखांच्या गुंतवणुकीचे प्रमाणपत्रही मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वाशीतील चेमन्नूर ज्वेलर्समध्ये जाऊन चौकशी केली असता, मेनन याने कोणत्याही योजनेमध्ये त्यांच्या नावाने पैसे भरले नसल्याचे तसेच त्याने त्यांचे जुने सोनेही जमा केले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच, बालामुरली याने दिलेले दोन्ही सर्टिफिकेटही खोटे व बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने कामोठे पोलिस ठाण्यात धाव घेतली.

आरोपीला जामीन


बालामुरली याने अनेक ग्राहकांकडून कंपनीच्या नावाने सोनेखरेदी करण्याच्या बहाण्याने आगाऊ रोख रक्कम व दागिने घेऊन कंपनीला १३ लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे सन २०२३मध्ये उघडकीस आले होते. त्यामुळे वाशी पोलिसांनी त्याला नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. त्यानंतर बालामुरली हा न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed