• Mon. Nov 25th, 2024

    सेनेची यादी, काँग्रेसची नाराजी; थोरात, वडेट्टीवारांना आठवली आघाडी; राऊत म्हणाले, चर्चा संपली

    सेनेची यादी, काँग्रेसची नाराजी; थोरात, वडेट्टीवारांना आठवली आघाडी; राऊत म्हणाले, चर्चा संपली

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबईतील काही जागा आणि सांगलीवरुन महाविकास आघाडीत पेच कायम असताना ठाकरेंनी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं घटकपक्ष नाराज झाले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंना आघाडीधर्माची आठवण करुन दिली आहे.

    काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भानं चर्चा करत आहोत, काँग्रेस त्या जागांबाबत आग्रही आहोत. अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणं योग्य नाही. आघाडीधर्माचं पालन सगळ्यांनीच करायला हवं असं माझं मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेनं या जागांवर फेरविचार करावा,’ असं आवाहन थोरात यांनी केलं.
    माझ्या कुटुंबात नाशिकची उमेदवारी द्या, अन्यथा…; भुजबळांचा इशारा, नेतृत्त्वावर दबावतंत्र?
    विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उद्धव ठाकरेंना आघाडीधर्माची आठवण करुन दिली आहे. ‘महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले. त्यांनी आघाडीधर्म पाळला असता तर बरं झालं असतं. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्यानं आघाडीधर्माला गालबोट लागलं आहे. त्यांनी यावर पुनर्विचार करावा, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.
    मविआसोबतची बोलणी फिस्कटली; वंचितनं शोधला नवा मित्र, जागावाटपाचं ठरलं सूत्र? ८ उमेदवार घोषित
    मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम यांनीही ठाकरेंच्या यादीवर आक्षेप नोंदवत उघड नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नाराजीची लाट उसळलेली असताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे सेनेनं चार जागा लढवण्यात गैर नाही. आम्ही कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली. तिथे गेल्या निवडणुकीत सेनेचा उमेदवार निवडून आला. कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगलीची जागा घेतली. आता यावर अजून किती चर्चा करणार? आमच्या दृष्टीनं चर्चा संपली, असं राऊत म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *