महायुतीला नाशिक लोकसभेची जागा ही सर्वाधिक महत्त्वाची असून ही जागा आपल्या पक्षाला मिळवण्यासाठी सर्व घटक पक्ष प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मंत्री भुजबळ यांची भेट देखील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देण्यासाठीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करत शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. तर, भाजप नेत्यांनी देखील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला उघड विरोध करत नाशिक लोकसभेची जागा महायुतीकडून भाजपच्या वाटेला द्यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली तर भाजप गोडसेंचे काम करणार नाही अशी उघड प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहे. स्थानिक पक्षीय बलाबल बघता नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघात भाजपकडे तर एक काँग्रेसकडे आणि दोन राष्ट्रवादीकडे आहेत त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी अशी मागणी भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे यंदा नाशिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी उभे असून गोडसे यांची हॅट्ट्रिक करण्यासाठी शिंदेसेना कामाला लागली आहे. ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ अशा घोषणा देत शिंदेसेना हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट झाल्यानंतर नाशिक लोकसभा मतदार संघाची उमेदवारी महायुतीत कोणत्या पक्षाला जाणार? यावर आता शिंदे आणि फडणवीस हे निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती देखील समोर येत असताना नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याने प्रत्येक पक्ष जागा मिळावी यासाठी दावा करू शकते. मात्र, ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच असणार, असे संकेत मागील काळात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील दिले होते. मात्र, भाजप नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर करत स्थानिक भाजप यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा न गमवता भाजपच्या वाट्याला ही जागा मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे.
मात्र स्थानिक मतदारांच्या मनात मात्र काय आहे, हे निवडणुकीतून समोर येईल. तरी, महायुतीतील घटक पक्षांच्या या उघड वादाचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो अशी चर्चा देखील सध्या शहरात सुरू आहे. महायुतीत उमेदवारीचा प्रश्न चिघळला असला तरी देखील ही जागा महाविकास आघाडीत जिंकेल अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहे. त्यामुळे महायुतीतील उमेदवारीचा वाद आणि थेट महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार यांच्यातील लढत यातून नाशिकचा खासदार नेमका कोण होणार? हे बघण आता महत्त्वाचं ठरणार आहे.