• Mon. Nov 25th, 2024

    पैनगंगा काठावरील ४७ गावांत जलसंकट, इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

    पैनगंगा काठावरील ४७ गावांत जलसंकट, इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : उमरखेड तालुक्यात जुलै महिन्यात अनेक गावांत अतिवृष्टी झाली. मात्र सध्या त्याच पैनगंगा नदीच्या काठावरील ४७ गावांत भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने वरच्या बाजूस बांधलेल्या इसापूर धरणातून नदीत पाणी सोडण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. अलीकडेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पण निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता गावकरी आंदोलनाच्या तयारीत आहे.

    पैनगंगा नदी काठावरील अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना नदीवर आहे. पण नदीचे पात्र कोरडे पडल्याने अनेक गावांतील योजना बंद पडल्या आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांच्या गुराढोरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात पैनगंगेचा आधार असे. पण आता नदीच कोरडी पडल्याने गुराढोरांचे हाल होत आहे. पैनगंगा नदीकाठाच्या पलीकडे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे. त्याभागातील नदी काठावरील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणाचे व्यवस्थापन नांदेड पाटबंधारे विभागाकडे आहे. उमरखेड येथे असलेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. जलसंकट दूर करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्च्याच्या वतीने उमरखेडचे उपविभागीय अधिकारी यांना फेब्रुवारी महिन्यात निवेदन देण्यात आले. नांदेड सिंचन विभागाकडून यवतमाळ जिल्ह्याधिकारी यांच्याकडे २७ कोटी थकीत दाखविले आहे.
    वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव
    चालू वर्षाची पाणीपट्टीबाबत तोडगा काढण्यात यावा. नदी पात्रात दोन वेळा पाणी सोडण्यात यावे. इसापूर धरणाच्या डाव्या कालव्याची दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी अशी मागणी गोपाळ वानखेडे, साईनाथ कदम, शिवदास हातमोडे, बाळासाहेब चौधरी, प्रल्हाद राठोड, श्रीधर देवसरकर यांनी केली आहे. दोन महिन्यांत धरणातून पाणी नदीत सोडण्यात न आल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *