• Sat. Sep 21st, 2024
राम शिंदे इच्छुक असून त्यांना तिकीट नाही, यशवंत सेनेचा मोठा निर्णय, धनगर समाजाचा एल्गार

अहमदनगर : धनगर समाजाला एक तर आरक्षण मिळाले नाही, तर दुसरीकडे योग्य लोकप्रतिनिधीत्वही मिळत नाही. राज्यातील दोन्ही राजघराण्यातील व्यक्तींना संधी दिली जात असताना धनगर समाजतही राजे होते, याचा विचार कोणी केला नाही. आमदार प्रा. राम शिंदे नगरमधून जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगत यशवंत सेनेतर्फे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली. यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी नगरमध्ये ही घोषणा केली.

रविवारी नगरमध्ये यशवंत सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना दोडतले यांनी सांगितले, ‘राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची जास्त ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागा वाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याऐवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा जास्त प्रभाव असलेल्या अहमदनगर, शिर्डी, नाशिक, माढा, सोलापूर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, यवतमाळ, सातारा व जालना या पंधरा मतदार संघात यशवंत सेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत,’ असेही दोडतले यांनी सांगितले.
राजकारण: सांगली लोकसभेवरुन काँग्रेसची कोंडी, ठाकरेंकडून परस्पर उमेदवार जाहीर, भाजप हॅटट्रिक करणार?

धनगर आरक्षणाच्या मागणीसंबंधी दोडतले म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी आम्ही राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पहिल्यांदा २१ दिवस उपोषण केले. आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेतले. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा उपोषण केले. मात्र आरक्षण देण्याबाबत दोन वेळा सरकारकडून शब्द देऊनही शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नावर राज्यभर लढा देणार्‍या आणि समाजात अधिक प्रभाव असलेल्या यशवंत सेनेतर्फे आता आम्ही निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच रविवारी ही बैठक घेण्यात आली.

धनगर मतांवर राज्य केलं पण आमच्याच समाजाला फसवलं, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात


मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही आजच आंतरवाली सराटी येथील बैठकीत मराठा उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा पर्याय समोर ठेवला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडूनही अपक्ष उमेदवार दिला जाईल किंवा भूमिका मान्य करणाऱ्या उमेदवारीला पाठिंबा दिला जाणार आहेत. तर दुसरीकडे आता याच भूमिकेतून धनगर समाजही निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजनाचा धोका असल्याने प्रमुख प्रक्षांच्या चिंतेत भर पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed