• Sat. Sep 21st, 2024
अनेक महिने भाजपला शिव्या पण निवडणुकीआधी त्यांच्याच ओव्या गायल्या, जानकरांची पलटी!

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीतच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून महायुतीने रासपला एक लोकसभेची जागा देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. धनगर समाज विरोधात जाऊ नये, यासाठी महायुतीने जानकरांना आपल्याकडेच ठेवून महाविकास आघाडीला मोठा शह दिला आहे. महादेव जानकर परभणी लोकसभेतून लढतील, अशी दाट शक्यता आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेतेमहादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यानी सविस्तर चर्चा केली. महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

माढ्याच्या जागेवरून मविआतून लढण्याविषयी जानकरांची झाली होती चर्चा

भाजपच्या धोरणांवर नाराज होऊन महादेव जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू केली होती. माढ्यातून राष्ट्रवादी शरजचंद्र पवार पक्षाकडून जानकर हे लोकसभा लढतील, अशीही शक्यता होती. खुद्द शरद पवार यांनीच तसे संकेत दिले होते. मात्र आज अचानक जानकर यांनी महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांची भेट घेऊन आपण महायुतीतच आहोत, असे सांगत महाविकास आघाडीला धक्का दिला.

महादेव जानकर मागील बऱ्याच महिन्यांपासून माढा आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत होते. त्यांनी परभणीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी परभणीमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed