• Mon. Nov 25th, 2024

    दाक्षिणात्य विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेवरुन मारहाण, महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

    दाक्षिणात्य विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेवरुन मारहाण, महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकविण्याची विनंती करणाऱ्या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषक विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार एका महाविद्यालयात घडला. या दुखापतीत दाक्षिणात्य विद्यार्थ्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या फिर्यादीवरून तीन संशयित विद्यार्थ्यांवर इंदिरानगर पोलिसांनी दुखापतीचा गुन्हा नोंदवला आहे.

    इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरातील एका महाविद्यालयात प्रियांशू राजेशकुमार पांडे (वय २०, रा. नेहरू नगर) हा विद्यार्थी बी. फार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या फिर्यादीवरून संशयित ओम बहारे, सुरेंद्र सूर्यवंशी, योगेश अहिरे या तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    प्रियांशू याने प्राध्यापकांना इंग्रजीतून प्रश्न विचारले. अनेकदा प्राध्यापक मराठीतून शिकवायचे. त्यावेळी ‘हिंदी अथवा इंग्रजीतूनही समजावून सांगा’, अशी विनंती प्रियांशू करायचा. त्याचा राग आल्याने वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी प्रियांशूला महाविद्यालयातच बेदम मारहाण केली. संशयितांना इंग्रजी भाषेतून शिकण्यास अडचणी येत होत्या. त्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत असून, संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    जेलमधल्या ‘या’ कैद्यांची मज्जाच मज्जा; आता मिळणार मांसाहारी ‘पाहुणचार’, टिफिन मेन्यूत काय-काय?
    काय आहे कारण?

    प्रियांशू हा दक्षिण भारतातील मूळ रहिवाशी आहे. त्याचे वडील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली नाशिकरोड सीआयएसएफ येथे झाली. त्यांचे कुटुंब सध्या नेहरूनगरात शासकीय वसाहतीत वास्तव्यास आहे. प्रियांशू याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इंग्रजीतून झाले आहे. तर, दक्षिण भारतातील रहिवाशी असल्याने जन्मापासूनच इंग्रजी भाषेचा प्रभाव त्याच्यावर अधिक आहे. परिणामी, महाविद्यालयातही तो सातत्याने इंग्रजीतून संवाद साधत प्राध्यापकांना प्रश्न विचारायचा. त्याचा राग आल्याने इतर विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed