• Mon. Nov 25th, 2024

    सर्वेक्षणानुसार मावळ ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची चर्चा, बारणेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह

    सर्वेक्षणानुसार मावळ ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची चर्चा, बारणेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेच्या उमेदवारीच्या मुद्यावरून ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे सर्वेक्षण अहवालावरून समजते. त्यामुळे बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे.मावळमध्ये महाआघाडीकडून संजोग वाघेरे-पाटील यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, महायुतीच्या गटात तूर्तास अंतर्गत घडामोडी चालू आहेत. उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    महायुतीच्या उमेदवारीबाबत वेगवेगळ्या यंत्रणांच्या सर्वेक्षण अहवालाचा आधार घेतला जात आहे. मतदारसंघात समाविष्ट असणारी पिंपरी-चिंचवड आणि पनवेल महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. याशिवाय विधानसभेचे दोन आमदार, विधान परिषदेच्या एक आमदार भाजपच्या आहेत. एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. याशिवाय नगरपालिका, पंचायत समित्यांवर भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. या परिस्थितीत महायुतीच्या उमेदवाराने भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. नसेल तर माजी मंत्री बाळा भेगडे, पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

    काँग्रेसची नवी यादी जाहीर, नागपुरात नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात, चंद्रपूरचा तिढा कायम

    गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी सद्यःस्थितीत शिवसेनेत फूट पडली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) नाव घेतले जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाकडे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरेसा संच नाही. मजबूत संघटन नाही. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी किंवा बारणे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींनाही अवगत करण्यात आले आहे.

    घाटाखालील पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघांत अजूनही शेतकरी कामगार पक्षाला मानणारा वर्ग आहे. त्यांची हक्काची मते असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या पक्षाला विश्वासात घेण्यासाठी महायुती आणि महाआघाडीकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला पक्षाचाच खासदार निवडून आणणे हिताचे असल्याचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे बारणे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तूर्तास ‘डेंजर झोन’मध्ये असून, प्रसंगी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा एका गटाचा आग्रह आहे. मात्र, त्या संदर्भात तूर्तास अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे बारणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार, की भाजपच्या तिकिटावर लढणार, हे स्पष्ट झालेले नाही.

    आमदार शेळकेंच्या नावाचीही चर्चा

    मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही भागात प्राबल्य आहे. मावळ आणि पिंपरी मतदारसंघात याच पक्षाचे आमदार आहेत. शिवाय गेल्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना पाच लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे या पक्षानेही महायुतीकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नावाची चर्चा आहे.

    अजित पवार मावळमध्ये पाठिंबा देतील, श्रीरंग बारणेंना विश्वास

    बारणेंसाठी मुख्यमंत्री आग्रही

    मावळमधून श्रीरंग बारणे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारीसाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष आग्रही आहेत. त्या अनुषंगाने मुंबईत बैठकांचे सत्र चालू आहे. राज्यातील काही जागांवर अदलाबदलीचे प्रस्ताव आहेत. त्याबाबत गांभीर्याने विचारविनिमय चालू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत बारणे यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांनी धरला असल्याचे समजते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed