• Sat. Sep 21st, 2024
तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. केवळ समायोजन किंवा तडजोड म्हणून महायुतीतील घटकपक्षांमध्ये हे पक्षांतर होत असल्याची माहिती आहे. आढळरावांनी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंगळवार २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त निघाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील काय म्हणाले?

सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, २६ तारखेला (मार्च) संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश करण्यास मला ग्रीन सिग्नल दिला आहे, असं आढळराव म्हणाले. पक्षांतरानंतर तिकीट मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “ज्या अर्थी पक्षप्रवेश करतोय, त्या अर्थी उमेदवारी निश्चित होईल का, असे बाळबोध प्रश्न विचारायची गरज नाही” असं उत्तर त्यांनी दिलं. “२०१९ चा बदला घेणार का?” या प्रश्नावरही “त्यासाठीच उभा राहणार आहे” अशी प्रतिक्रिया आढळरावांनी दिली.
उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेतून थेट लोकसभेचं तिकीट?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, तसेच मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे. या दोघांनी पण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाला क्लीन चिट दिली आहे, अशी माहिती आढळरावांनी दिली.
‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?
मला काय, माझ्या जनतेला विजयाची १०० टक्के खात्री आहे. माझं जे कॅलक्युलेशन आहे, आजपर्यंत मी ज्या निवडणुका जिंकलो आहे, काही नसताना पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकलो होतो दुसरी लोकसभा निवडणूक १ लाख ८० हजारांच्या मताधिक्याने, तर तिसरी निवडणूक ३ लाख ३ हजारांनी जिंकलो होतो. चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आढळरावांनी व्यक्त केली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

महायुतीतील सर्व घटकपक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवायचं आहे. अबकी ४०० पार ही संकल्पना केंद्र पातळीवर राबवण्यासाठी आणि राज्यात मिशन ४५, मिशन ४८ पार करण्यासाठी आम्ही सगळे मतभेद विसरुन एक दिलाने कामं करणार आणि महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणणार. ही महायुती आहे.. तिन्ही पक्षांनी ठरवलंय, त्यामुळे कोणी कोणाला पळवलं असं नाही, तर हा महायुतीचा उमेदवार आहे, असं म्हणत आढळराव रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed