• Sat. Sep 21st, 2024

भूजल पातळीचा आलेख घटताच; वाढत्या उपशामुळे नाशिकमधील ‘या’ तालुक्यांची वाटचाल ओसाड होण्याच्या दिशेने

भूजल पातळीचा आलेख घटताच; वाढत्या उपशामुळे नाशिकमधील ‘या’ तालुक्यांची वाटचाल ओसाड होण्याच्या दिशेने

नवनाथ वाघचौर, नाशिकरोड : नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील भूजल पातळीचा आलेख २०१९ पासून तर २०२४ असा सलग पाच वर्षांत घसरत गेला असल्याचे वास्तव असून त्यातील चांदवड, मालेगाव या दोन तालुक्यांतील सरासरी भूजल पातळीत दोन मीटरहून तर बागलाण, कळवण, नांदगाव, निफाड आणि येवला या पाच तालुक्यांतील सरासरी भूजल पातळीत एक मीटरहून जास्त घट नोंदविली गेल्याचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालातून स्पष्ट झाल्याने या नाशिक जिल्ह्यातील उत्तर- पूर्व भागातील या सात तालुक्यांचा प्रवास वैराण वाळवंटाच्या दिशेने सुरू झाल्याचा इशारा मिळाला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या जलदिनाची थीम शांततेसाठी पाण्याचा वापर अशी आहे. याचा अर्थ पाणी हेच जागतिक शांततेला कधीतरी कारणीभूत ठरणार आहे. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जगाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या संकटाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘जागतिक जलदिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर निव्वळ जमिनीवर दिसणाऱ्या पाण्याचा विचार करून चालणार नाही. तर भूजल पातळीत येणारी घटदेखील भविष्यात मोठ्या संकटाला आमंत्रण देणारे ठरू शकते.

नाशिक जिल्ह्यातदेखील भूजल पातळीत २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात सातत्याने घट आलेली असल्याचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालातून समोर आले आहे. भूजल पातळीत होत असलेली घट अशीच सुरू राहिली, तर भविष्यात जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता आणि कालावधीची व्याप्ती वाढून भीषण संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यात चांदवड आणि मालेगाव हे दोन तालुके अग्रस्थानी असून त्यापाठोपाठ बागलाण, कळवण, नांदगाव, निफाड आणि येवला या तालुक्यांचाही प्रवास वाळवंटाच्या दिशेने सुरू झाला आहे. इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांत गेल्या पाच वर्षांत नोंदविलेली भूजल पातळीत आलेली घट इतर तालुक्यांच्या तुलनेत तशी कमी असणे एवढीच एक दिलासादायक बाब आहे.

भूजल पातळीत घट येण्याची कारणे

भूजलाचा अमर्याद आणि अवाजवी उपसा, पिकांना पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर न करणे, साठ मीटरची मर्यादा असतानाही प्रत्यक्षात २५० मीटरपर्यंत किंवा त्याहूनही जास्त खोलीचे बोअरवेल घेऊन भूजल उपसा करणे, अमर्याद विहिरी खोदणे, अस्तरीकरण केलेल्या शेततळ्यांची अमर्याद वाढ, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपाययोजना करणाऱ्या जबाबदार घटकांची कमतरता, वाढते शहरीकरण, महामार्गांची संख्या, वृक्षारोपण व संवर्धनाला आलेले कागदोपत्री सोपस्कार, औद्योगिकीकरणासाठी जमिनीचे वाढते अस्तरीकरण.

आपल्याकडे भूजलाच्या उपशाच्या तुलनेत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठीचे प्रयत्न खूपच तोकडे ठरतात. खासकरून शेतीसाठी आधुनिक तंत्राधारीत आणि आवश्यक तितकाच पाणी वापर करणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकाने पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. खासकरून शहरी भागात भूजल रिचार्ज करण्यासाठी कृतीशील प्रयत्नाची जास्त गरज आहे.- प्रवीण बधान, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, नाशिक

अनेक तालुक्यांत दूषित पाणी; भूजल सर्वेक्षण विभागातर्फे संकलित नमुन्यांत जिल्ह्यातील वास्तव उघड
नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची गेल्या पाच वर्षांची तुलनात्मक भूजल पातळी (मीटर)
तालुका—निरीक्षण विहिरींची संख्या–२०१९–२०२०–२०२१–२०२२–२०२३–गेल्या ५ वर्षांतील सरासरी–२०२४–सरासरी भूजल पातळी व २०२४ मधील फरक

नांदगाव—२३—७.७१—५.३७—४.६७—३.७०—४.०५—५.१०—६.२०— -१.१०
मालेगाव—२२—८.६०—५.२२—५.०२—४.८५—४.८४—५.७२—७.७१— -२.००
निफाड—२०—५.७१—३.३८—४.०५—४.३७—३.५६—४.२७—५.९७— -१.७०
बागलाण—१८—११.०१—५.८६—५.७३—६.८५—६.२४—७.१५—८.३३— -१.१९
सिन्नर—१८—८.०७—५.२३—३.७७-४.४४—३.९५—५.१०—५.४७— -०.३७
येवला—१३—७.५२—४.४८—३.०८—३.१५—३.०३—४.३०—५.८१— -१.५१
त्र्यंबकेश्वर—१२—३.६७—२.१३—२.७२—२.०७—१.७६—२.५०—३.०१— -०.५१
दिंडोरी—१०—५.६९—४.१०—४.०७—४.२२—२.७१—४.२६—४.९६— -०.७०
इगतपुरी—१०—३.१२—२.५०—२.३२—२.१५—२.७७—२.५५—३.१६— -०.६१
नाशिक—९—६.१७—४.६४—३.७६—३.४४—३.१९—४.२५—५.१६— -०.९०
देवळा—७—७.६९—५.००—४.९५—५.२१—४.३३—५.४५—६.०७— -०.६२
सुरगाणा—७—४.६१—३.१४—३.४०—३.४६—२.११—३.४५—४.२४— -०.७९
कळवण—६—८.०५—६.२८—६.५८—५.९३—४.५७—६.३७—७.९०— -१.५३
चांदवड—६—८.६३—४.८३—४.२५—४.२३—३.९५—५.२०—७.५५— -२.३५

पेठ—४—५.५५—२.८३—३.३८—२.५०—१.८७—३.३०—३.८८— -०.५८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed